(मुंबई / वृत्तसंस्था)
मुंबई पोलीस दलात कार्यरत असलेले पोलीस शिपाई विजय बागुल यांनी कुर्ला येथील नेहरूनगर पोलीस वसाहतीतील राहत्या घरी आत्महत्या केली. पायाला झालेली अंतर्गत दुखापत बरी होत नसल्याने ते अनेक दिवसांपासून त्रस्त होते. उपचार करूनही वेदना कमी होत नसल्यामुळे ते मानसिक नैराश्यात गेल्याची माहिती समोर आली आहे. बागुल यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.
विजय बागुल हे दिंडोशी पोलीस ठाण्यात कार्यरत होते. २००९ मध्ये ते मुंबई पोलीस दलात दाखल झाले होते. गेल्या चार वर्षांपासून ते दिंडोशी पोलीस ठाण्यात सेवा बजावत होते. पायाच्या दुखापतीमुळे उद्भवलेल्या त्रासातून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याची माहिती आहे.
बागुल यांच्या पश्चात पत्नी कोमल, १० वर्षांचा मुलगा यश आणि ६ वर्षांची मुलगी श्रावणी असा परिवार आहे. त्यांचे पार्थिव मूळगावी नाशिक येथे नेण्यात आले. कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याच्या निधनाने मुंबई पोलीस दलात हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, विजय बागुल यांच्या आत्महत्येमुळे मुंबई पोलीस दलातील जवानांच्या आत्महत्यांचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे.


