(देवरूख / सुरेश सप्रे)
संगमेश्वर तालुक्यातील सांगवे येथील प्रगतशील शेतकरी व संगमेश्वर अँग्रो स्टार फार्मफ्रेश प्रोड्युसर कंपनीचे अध्यक्ष विलास शेलार यांना उत्कृष्ट प्रगतीशील शेतकरी या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
कुणबी सेवा संघ दापोली यांच्यावतीने जिल्हातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांना सेवाव्रती शिंदे गुरूजी स्मृती पुरस्कार देऊन गौरविण्यात येते.
सदरचा कार्यक्रम दापोली येथे सेवाव्रती शिंदे गुरूजी सभागृहात संपन्न झाला. यावेळी व्यासपीठावर कुणबी समाजाचे नेते व माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते, प्रवचनकार हभप ज्ञानेश्वर बंडगर, कुणबी सेवा संघाचे अध्यक्ष प्रभाकर शिंदे, उपाध्यक्ष डॉ. प्रमोद सावंत, डॉ. अशोक निर्वाण, प्रदीप इप्ते, हरीचंद्र गीते आदी मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमात संगमेश्वर तालुक्यातील सांगवे गावचे सुपुत्र विलास शेलार यांचा माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते व प्रभाकर शिंदे यांचे हस्ते उत्कृष्ट प्रगतीशील शेतकरी पुरस्कार देऊन गौरविण्यात आले..
विलास शेलार यांनी पोलीस खात्यातून सेवानिवृत्त झाले वर आपल्या गावी ( सांगवे ) येथे येवून शेतीवर लक्ष देत सेंद्रिय शेती वर भर देत विविध प्रयोग करून अनेक पिकांची लागवड करून ती यशस्वी करून दाखवली. पंचक्रोशीतील शेतकरी वर्गाला बरोबर घेत शाश्वत शेतीची कास धरून रोजगाराची हमी देत युवकांनी शेतीवाडीकडे वळावे याकडे विशेष लक्ष दिले. मेहनतीने आपल्या भागातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी प्रयत्न केले व ते यशस्वी झालेने तालुक्यातील शेतकऱ्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी तालुक्यातील शेतकऱ्यांना एकत्र आणत अँग्रोस्टार फार्म फ्रेश प्रोड्युसर कंपनीचे सदस्य झाले.
कालांतराने या कंपनी च्या अध्यक्षपदाची जबाबदारी स्विकारली. या कंपनीच्या माध्यमातून तालुक्यातील शेतकऱ्यांना शेती विषयक माहिती देत विविध प्रशिक्षण शिबीर आयोजित करून प्रगतशेती करताना ती सेंद्रिय शेती करण्यासाठी मदतीचा हात देण्यासाठी प्रयत्न केला. अश्याप्रकारे शेतकऱ्यांना लाभ व्हावा यासाठी प्रयत्नशील असणाऱ्या विलास शेलार यांना उत्कृष्ट प्रगतीशील शेतकरी पुरस्कार मिळाला आहे. याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
आपल्याला मिळालेल्या पुरस्कारामध्ये आपल्या कंपनीचा मोलाचा वाटा असुन यापुढे जातीत जास्त लोकाना शाश्वत शेतीकडे वळवण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे ते आवर्जुन नमुद केले.

