(रत्नागिरी / वार्ताहर)
मुंबई विद्यापीठाच्या कोंकण विभाग क्रमांक ४ अंतर्गत आयोजित आंतरमहाविद्यालयीन पुरुष व महिला टेबल टेनिस स्पर्धेत गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या (स्वायत्त) पुरुष संघाने दमदार कामगिरी करत सुवर्णपदक पटकावले. या विजयासह महाविद्यालयाच्या पुरुष संघाने कोंकण विभाग टेबल टेनिस स्पर्धेचे २०२६-२७ या वर्षाचे अजिंक्यपद मिळवले. महिला संघानेही उल्लेखनीय कामगिरी करत कांस्यपदकासह तृतीय क्रमांक मिळवला.
कोंकण विभाग आणि घरडा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, खेड यांच्या संयुक्त विद्यमाने १० ते १२ ऑगस्ट २०२६ या कालावधीत या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेत गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या दोन्ही संघांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत महाविद्यालयाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला.
सुवर्णपदक विजेत्या पुरुष संघात तृतीय वर्ष विज्ञान शाखेतील अथर्व म्हस्के, आदित्य शिर्के, रोहन जाधव आणि आदित्य लांजेकर तसेच तृतीय वर्ष बीबीएचा विशाल परिहार यांचा समावेश होता. महिला संघात तृतीय वर्ष विज्ञान शाखेतील स्नेहा कदम, मैथिली डोर्लेकर आणि श्रावणी शिंदे तसेच तृतीय वर्ष बीबीएच्या समृद्धी मुळ्ये आणि आदिती जड्यार यांनी सहभाग घेतला.
महाविद्यालयाच्या पुरुष व महिला टेबल टेनिस संघांना क्रीडा संचालक डॉ. विनोद शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले. क्रीडा शिक्षक प्रा. कल्पेश बोटके आणि श्री. श्रीपाद गुरव यांनी खेळाडूंना मोलाचे सहकार्य केले.
या उल्लेखनीय यशाबद्दल र. ए. सोसायटीच्या कार्याध्यक्षा शिल्पाताई पटवर्धन, कार्यवाह सतीशजी शेवडे, जिमखाना समितीचे अध्यक्ष डॉ. चंद्रशेखर केळकर, संस्थेचे सर्व सदस्य, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, प्रशासकीय उपप्राचार्य डॉ. सुरेंद्र ठाकूरदेसाई, तीनही शाखांचे उपप्राचार्य डॉ. विवेक भिडे, प्राध्यापकवर्ग आणि कर्मचारी यांनी सर्व विजयी खेळाडूंचे अभिनंदन केले. तसेच आगामी स्पर्धांसाठी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.

