(रत्नागिरी /प्रतिनिधी)
रत्नागिरी जिल्ह्यात अवैध दारू विक्री आणि सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी व्यापक मोहीम उघडली असून, दोन दिवसांत जिल्ह्यात विविध ठिकाणी धडक कारवाया करण्यात आल्या. २२ आणि २३ मे रोजी जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत राबविण्यात आलेल्या या मोहिमेत दारूबंदी कायद्यांतर्गत तब्बल १३ गुन्हे दाखल करण्यात आले असून, गावठी हातभट्टी, देशी तसेच गोवा बनावटीच्या दारूसह हजारो रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
लांजा पोलीस ठाण्याच्या हद्दीत सापुचेतळे येथे बंद दुकानाच्या गाळ्यामागे संशयास्पद हालचाली सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचला. या कारवाईत रोहन भागेश गोरे याला बिगरपरवाना विक्रीच्या उद्देशाने गोवा बनावटीची आणि देशी दारू बाळगताना रंगेहाथ पकडण्यात आले. त्याच्याकडून ‘किंग फिशर’ कॅन, ‘हनी ब्लेंड’, ‘रॉयल स्टॅग’ व्हिस्की तसेच देशी दारू असा एकूण ४ हजार ९५५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
नाटे सागरी पोलीस ठाण्याच्या पथकानेही सलग तीन कारवाया करत दारूतस्करांवर कारवाईचा बडगा उगारला. कशेळी बांध येथे दशरथ मुरारी फोडकर याच्याकडून ९०० रुपये किमतीच्या गोवा बनावटीच्या ‘डॉक्टर अँड’ दारूच्या ३० बाटल्या जप्त करण्यात आल्या. तर कुवेशी नार्वेकरवाडी येथे सुदेश दत्ताराम नार्वेकर याला महाराष्ट्र बनावटीच्या पाच दारूच्या बाटल्यांसह ताब्यात घेण्यात आले. याशिवाय वाडा पालये येथील एस.टी. पिकअप शेडजवळ दिलीप श्रीकृष्ण पेडणेकर याला आठ लिटर गावठी हातभट्टीच्या दारूसह अटक करण्यात आली.
दापोली पोलीस ठाण्याच्या हद्दीतही अवैध दारूविरोधातील मोहीम सुरूच ठेवण्यात आली. फणसु निकमवाडी रस्त्याशेजारी रघुनाथ बालू मांडवकर याला १० लिटर गावठी हातभट्टीच्या दारूसह पकडण्यात आले. या दारूची किंमत सुमारे १ हजार रुपये आहे. जयगड सागरी पोलिसांनीही जयगड बौद्धवाडी ते गणेशवाडी मार्गालगत झाडाच्या आडोशाला सुरू असलेल्या अवैध दारू व्यवहारावर छापा टाकला. या कारवाईत सादिक आदम सोलकर याला आठ लिटर हातभट्टीच्या दारूसह ताब्यात घेण्यात आले. जप्त दारूची किंमत ८२० रुपये असल्याचे समोर आले आहे.
दरम्यान, जिल्हाभर सुरू असलेल्या या धडक मोहिमेमुळे अवैध दारू व्यवसाय करणाऱ्यांचे धाबे दणाणले असून, पोलिसांनी अशा कारवाया आणखी तीव्र करण्याचा इशारा दिला आहे. सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन आणि बेकायदेशीर दारूविक्रीमुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्याने पोलिसांकडून या धडक कारवाया सुरू असल्याचे बोलले जात आहे.

