(रत्नागिरी / प्रतिनिधी)
रत्नागिरी येथील गयाळवाडीतील एक मोबाईल शॉपी दोन चोरट्यांनी फोडून एक लॅपटॉपसह दुरूस्तीला आलेले विविध मोबाईल एकूण ३४ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून दोघे चोरटे पसार झाले होते. या प्रकरणी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र या चोरीचा छडा लावण्यासाठी पोलिसांनी वेगाने चक्रे फिरवली. दुसऱ्या दिवशीच ( गुरुवारी, दिनांक 16 जानेवारी 2025 ) शादाब मोहम्मद रेहमूद्दीन मुस्तकीम, झुबेर लियाकत अली या दोन संशयित आरोपींना ग्रामीण पोलिसांनी गोवा राज्यामधील मडगाव रेल्वे स्टेशनमधून ताब्यात घेतले आहे.
या चोरीच्या घटनेनंतर चार पोलिसांचे पथक स्थापन केले होते. ही चोरीची घटना बुधवारी, दिनांक १४ जानेवारी २०२५ रोजी घडली होती. पोलिसांनी पकडलेल्या दोघा चोरट्यांनी मोबाईल दुरुस्ती शॉपीचा पत्रा उचकटून आत प्रवेश करून शॉपी मधील लेनेवो लॅपटॉप व दुरूस्तीला आलेले विविध मोबाइल तसेच इतर वस्तु मिळून एकूण ३४ हजार रुपयांचा किमतीचा मुद्देमाल लंपास केला होता. पोलिसांनी गुन्हा रजिस्टर नंबर 13/2025 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. चोरीचा छडा लावण्यासाठी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी राजेंद्र यादव यांनी वेगाने चक्रे फिरवून चोवीस तासांमध्ये उत्तर प्रदेशमधील दोन आरोपींच्या गोव्या राज्यातून मुसक्या आवळल्या आहेत.
यामध्ये शादाब मोहम्मद रेहमूद्दीन मुस्तकीम ( वय 27 वर्ष, रा. हाऊस नं. 1817, अक्षा मस्जिद, मुस्तफाबाद, लोणी देहात पोस्ट लोणी, जिल्हा गझियाबाद, उत्तर प्रदेश) आणि झुबेर लियाकत अली (वय. 22 वर्ष, रा. वार्ड नं. 15,गल्ली नं. 3, उदगाह मोहल्ला, तालुका बडोत, जिल्हा बागपथ, उत्तर प्रदेश) अशी संशयित आरोपींची नावे आहेत. या दोघांना रेल्वे पोलीस दलाच्या मदतीने गोवा राज्यातील मडगाव रेल्वे स्टेशनमधून ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच पोलिसांनी त्यांचेकडून चोरीस गेलेल्या सर्व मुद्देमाल हस्तगत केला आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक राजेंद्र यादव यांच्या माध्यमातून पो.उनि. अभय तेली, सपफौ विनोद भितळे,पोहवा विनायक राजवैद्य व पोकॉ राजेंद्र वळवी यांनी केली.