(रत्नागिरी / वार्ताहर)
रत्नागिरी जिल्ह्यातील विविध भागांमध्ये गंजलेले आणि जीर्ण झालेले विद्युत खांब, वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा तसेच वीजपुरवठा बंद असतानाही वीजबिलांमध्ये तफावत जाणवत असल्याच्या तक्रारींची दखल घेऊन तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी बहुजन समाज पार्टीच्या वतीने महावितरणच्या अधीक्षक अभियंत्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.
जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये पावसाळ्याच्या काळात अनेक ठिकाणी वीज खंडित होण्याच्या घटना घडत आहेत. महावितरणच्या कर्मचाऱ्यांकडून मान्सूनपूर्व देखभाल व दुरुस्तीची कामे अपेक्षित पद्धतीने होत नसल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर दोन ते तीन दिवस वीज येत नसल्याच्या तक्रारीही नागरिकांकडून करण्यात येत आहेत.
जिल्ह्यातील विविध भागांमध्ये रस्त्यालगत आणि वस्ती परिसरातील लोखंडी विद्युत खांब गंजून जीर्ण झाले आहेत. त्यामुळे अशा धोकादायक खांबांचा सर्व्हे करून महावितरणच्या यंत्रणेमार्फत त्यांचे ऑडिट करावे आणि आवश्यकतेनुसार जीर्ण खांब तातडीने बदलण्यात यावेत, अशी मागणी बहुजन समाज पार्टीने केली आहे.
तसेच, वीजपुरवठा दोन ते तीन दिवस खंडित असतानाही वीजबिलांमध्ये त्यानुसार कोणतीही तफावत अथवा सवलत दिसून येत नसल्याची नागरिकांची तक्रार आहे. या प्रकाराचीही चौकशी करून ग्राहकांना योग्य बिल आकारण्यात यावे, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.
या सर्व बाबींची गांभीर्याने दखल घेऊन रत्नागिरी जिल्ह्यातील तिन्ही कार्यकारी अभियंत्यांना सूचना देण्यात येतील आणि संबंधित प्रश्नांवर कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन महावितरणच्या अधीक्षक अभियंत्यांनी दिल्याचे बहुजन समाज पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
यावेळी रत्नागिरी विधानसभा प्रभारी किशोर पवार, रत्नागिरी विधानसभा अध्यक्ष राजेश सावंत, विधानसभा उपाध्यक्ष अनंत पवार, अॅड. प्रविण कांबळे, रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा प्रभारी अनिकेत पवार आदी उपस्थित होते.

