(रत्नागिरी)
हिवाळा आणि ख्रिसमसच्या सुट्यांमध्ये वाढणारी प्रवाशांची प्रचंड गर्दी लक्षात घेऊन मध्य व कोकण रेल्वेने डिसेंबर 2025 ते जानेवारी 2026 दरम्यान विविध गाड्यांच्या विशेष फेऱ्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे गोवा, कोकण, कर्नाटक आणि केरळकडे जाणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. तीन महत्त्वाच्या मार्गावर 22 डब्यांच्या विशेष गाड्या सोडण्यात येणार असून, यामध्ये वातानुकूलित, स्लिपर आणि जनरल असे सर्व प्रकारचे डबे उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. या गाड्यांसाठीचे तिकीट बुकिंग आयआरटीसीवर उपलब्ध आहे. नियमित गाड्यांच्या दरांप्रमाणेच तिकीटांचे दर असणार आहेत.
मुंबई सीएसएमटी-करमाळी
प्रवाशांकडून मोठी मागणी असणारी मुंबई सीएसएमटी-करमाळी ही विशेष गाडी (01151/01152) डिसेंबरपासून 5 जानेवारी 2026 पर्यंत रोज धावणार आहे. मुंबई सीएसएमटी स्थानकातून ही गाडी (Train) पहाटे रात्री 12.20 मिनिटांनी सुटून त्याच दिवशी दुपारी 1.30 मिनिटांनी करमळी येथे पोहोचेल. परतीची गाडी करमाळीहून दुपारी 2.15 वाजता सुटून दुसऱ्या दिवशी पहाटे 3:45 मिनिटांनी मुंबईत पोहोचेल. या गाड्यांना दादर, ठाणे, पनवेल, पेण, रोहा, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, कणकवली, कुडाळ व थिविम येथे थांबे असतील.
एलटीटी – तिरुवनंतपुरम (साप्ताहिक)
महाराष्ट्र- केरळ मार्गावरील अतिरिक्त गर्दीसाठी लोकमान्य टिळक टर्मिनल – तिरुवनंतपुरम उत्तर (01171/01172) ही साप्ताहिक गाडी 18, 25 डिसेंबर, तसेच 1 व 8 जानेवारी रोजी एलटीटीहून सांयकाळी 4 वाजता सुटेल. दुसऱ्या दिवशी रात्री 11:30 वाजता ती तिरुवनंतपुरम उत्तर येथे पोहोचेल. या गाडीला (Train) कोकण व केरळातील 40 पेक्षा अधिक स्थानकांवर थांबा देण्यात आला आहे.
एलटीटी – मंगळुरू (साप्ताहिक)
एलटीटी-मंगळुरू (01185/01186) ही साप्ताहिक गाडी 16, 23 आणि 30 डिसेंबर, तसेच 6 जानेवारी रोजी सायंकाळी 4 वाजता एलटीटीहून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 10:05 वाजता मंगळुरू जंक्शनला पोहोचेल. परतीच्या गाड्या 17, 24, 31 डिसेंबर आणि 7 जानेवारी रोजी दुपारी 1 वाजता सुटून दुसऱ्या दिवशी 6:50 मिनिटांनी एलटीटी येथे येतील, या गाडीला ठाणे, पनवेल, पेण, रोहा, खेड, चिपळूण, कणकवली, कुडाळ, थिविम, करमाळी, मडगाव, कारवार, उडुपी, सुरतकल आदी ठिकाणी थांबे दिले आहेत.

