(पुणे / वृत्तसंस्था)
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील (एसटी) सुमारे ८३ हजार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी वेतन मिळावे, यासाठी परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी प्रशासनाला तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत. नोव्हेंबर महिन्याचा पगार सणापूर्वीच कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा करण्याच्या दृष्टीने आवश्यक आर्थिक नियोजन आणि निधी उपलब्धतेसाठी प्रयत्न करण्यास त्यांनी सांगितले आहे.
एसटी महामंडळातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे वेतन साधारणपणे दर महिन्याच्या ७ ते १० तारखेदरम्यान अदा केले जाते. मात्र, यंदा ६ नोव्हेंबरपासून दिवाळीला सुरुवात होत असल्याने कर्मचाऱ्यांना सणाच्या आधीच पगार मिळणे आवश्यक आहे. दिवाळीनिमित्त कुटुंबासोबत खरेदी, घरगुती खर्च आणि अन्य आर्थिक नियोजन करता यावे, यासाठी वेतन वेळेत मिळणे महत्त्वाचे असल्याचे लक्षात घेऊन सरनाईक यांनी ही सूचना केली आहे.
दिवाळीपूर्वी वेतन अदा करण्यासाठी एसटी महामंडळाच्या अर्थ व नियोजन विभागाने शासनाकडे तातडीने पाठपुरावा करावा, असे निर्देश देण्यात आले आहेत. कर्मचाऱ्यांचे वेतन देण्यासाठी आवश्यक असलेले अनुदान वेळेत मिळवण्याबरोबरच, मागील महिन्यातील विविध प्रवासी सवलत योजनांच्या प्रतिपूर्तीपोटी शासनाकडून येणे असलेली प्रलंबित रक्कम उपलब्ध करून घेण्यासाठीही विशेष प्रयत्न करण्यास सांगण्यात आले आहे.
एसटी महामंडळाच्या आर्थिक अडचणींचा परिणाम कर्मचाऱ्यांच्या दिवाळीच्या आनंदावर होऊ नये, यासाठी प्रशासनाने या विषयाला सर्वोच्च प्राधान्य द्यावे, असे सरनाईक यांनी स्पष्ट केले. शासनाकडून आवश्यक निधी मिळवण्यासाठी समन्वय साधून वेतन वितरणाचे नियोजन करावे आणि दिवाळीपूर्वी कर्मचाऱ्यांच्या हातात पगार पडेल, याची दक्षता घ्यावी, असे निर्देश त्यांनी दिले आहेत.


