(रायगड / पोलादपूर)
कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणाऱ्या आंबेनळी घाटात काल रविवारी रात्री भीषण अपघात घडला असून, स्कॉर्पिओ गाडी खोल दरीत कोसळल्याने आठ तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. दापोली येथे पर्यटनासाठी गेलेले सातारा जिल्ह्यातील आजगाव येथील युवक आपल्या गावाकडे परतत असताना हा भीषण अपघात घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
ही दुर्घटना पोलादपूर तालुक्यातील दाभिळ गाव हद्दीत घडली. घाटातील तीव्र वळणावर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने स्कॉर्पिओ थेट 500 ते 700 फूट खोल दरीत कोसळली. रात्रीचा अंधार, दाट धुके आणि दुर्गम भौगोलिक परिस्थितीमुळे बचावकार्याला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला.
अपघाताची माहिती मिळताच प्रतापगड ट्रेकर्स, महाबळेश्वर रेस्क्यू टीम, सिस्केप महाड, पोलादपूर पोलीस प्रशासन आणि स्थानिक बचाव पथके तातडीने घटनास्थळी दाखल झाली. दोरांच्या सहाय्याने रात्रभर दरीत उतरून अडकलेल्या प्रवाशांचा शोध घेण्यात आला. सोमवारी सकाळपर्यंत दोन मृतदेह बाहेर काढण्यात यश आले असून, उर्वरित मृतदेह बाहेर काढण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.
घटनेची गंभीरता लक्षात घेऊन उपविभागीय पोलीस अधिकारी शंकर काळे, तहसीलदार कपिल घोरपडे आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंद रावडे यांनी घटनास्थळी भेट देत बचावकार्याचा आढावा घेतला. विविध विभागांमध्ये समन्वय साधून शोधमोहीम वेगाने राबवण्याच्या सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत.
प्राथमिक माहितीनुसार मृतांमध्ये महेश अनिल पवार (२५), आदित्य अशोक साळुंखे (२१), रितेश राजेंद्र लोखंडे (२५), सुहास जितेंद्र लोखंडे (२०), अंश समीर चव्हाण (१८), उत्कर्ष आनंद शिंगटे (२१), अनिल अभिमन्यू शिंगटे (२५) आणि नितीन किसन नायकोंडे (३५) यांचा समावेश असल्याचे समजते. ( बातमी अपडेट होत आहे)
दरम्यान, आंबेनळी घाटातील हा पहिलाच मोठा अपघात नसून, यापूर्वीही येथे अनेक भीषण दुर्घटना घडल्या आहेत. काही वर्षांपूर्वी डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या कर्मचाऱ्यांची बस दरीत कोसळून 30 जणांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे पुन्हा एकदा आंबेनळी घाटाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

