(खेड / प्रतिनिधी)
खेड तालुक्यातील लोटे येथून महावितरण कंपनीची सुमारे ३० हजार रुपये किमतीची केबल चोरून पसार झालेल्या संशयिताला खेड पोलिसांनी अटक केली आहे. दत्तात्रेय शिवाजी गोडसे (२५, रा. नरळेवस्ती, खिलारवाडी, सांगोला) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
लोटे परिसरातून महावितरणची केबल चोरीला गेल्याची घटना २८ मार्च २०२६ रोजी उघडकीस आली होती. याप्रकरणी खेड पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर संशयित पसार झाला होता. त्यामुळे पोलिसांनी त्याचा शोध घेण्यासाठी तपासाची चक्रे वेगाने फिरवली.
पोलीस उपविभागीय अधिकारी शैलेश सणस आणि पोलीस निरीक्षक विवेक अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्रीकृष्ण येवले यांनी तपास सुरू केला. पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे संशयिताचा ठावठिकाणा शोधून त्याला ताब्यात घेतले. चौकशीनंतर त्याला अटक करण्यात आली.
पोलिसांनी संशयिताकडून चोरीला गेलेली महावितरणची केबल हस्तगत केली आहे. या प्रकरणातील तपास सुरू असून, अटक करण्यात आलेल्या संशयिताचा अन्य चोरीच्या गुन्ह्यांमध्ये सहभाग आहे का, याचीही माहिती पोलीस घेत आहेत.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक श्रीकृष्ण येवले करत आहेत.

