(रत्नागिरी / वार्ताहर)
विद्यार्थी हा आपल्यासाठी देव आहे, या भावनेतून विद्यार्थ्यांची सेवा करणारा आदर्श माळी म्हणून काम करत विद्यार्थी प्रगतीसाठी अविरत धडपडणाऱ्या माणी नंबर १ शाळेच्या पदवीधर शिक्षिका दिप्ती दिलीप यादव यांना रत्नागिरी जिल्हा परिषदेचा सन २०२६-२७ चा ‘आदर्श शिक्षक पुरस्कार’ जाहीर झाला आहे. त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल संपूर्ण खेड तालुक्यातून त्यांचे कौतुक होत आहे.
दिप्ती यादव यांनी आपल्या शैक्षणिक कारकिर्दीची सुरुवात देवघर विद्यामंदिर जिल्हा परिषद शाळेतून केली. आदिवासी समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात टिकवून ठेवण्याचे महत्त्वपूर्ण काम त्यांनी या शाळेत केले. त्यानंतर मोहाने ऐनवली केंद्र शाळेत कार्यरत असताना त्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल १०० टक्के लावला. याच शाळेत त्यांनी इन्फोसिस कंपनीच्या माध्यमातून शाळेला चार संगणक कक्ष मिळवून दिले.
खेड शहरातील खेड नंबर दोन शाळेत कार्यरत असताना त्यांनी पुन्हा एकदा शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल १०० टक्के लावून दाखवला. तसेच विद्यार्थ्यांची १०० टक्के उपस्थिती राहावी यासाठी विविध उपक्रम राबवले.
दिप्ती यादव यांच्या शैक्षणिक कारकिर्दीला खऱ्या अर्थाने बहर आला तो वाडी बीड शाळेतील कार्यकाळात. या शाळेतील आदिवासी विद्यार्थ्यांसाठी त्यांनी आदर्शवत काम केले. शिक्षणाचा प्रवाह थांबलेल्या अनेक आदिवासी विद्यार्थ्यांना त्यांनी विविध स्पर्धा परीक्षांना बसवले. त्यापैकी एका विद्यार्थिनीची नवोदय विद्यालयासाठी निवड झाली.
दिप्ती यादव या स्वतः एक आदर्श कवयित्री असून त्यांच्या अनेक कविता मासिके, वर्तमानपत्रे तसेच विविध कवितासंग्रहांमध्ये प्रसिद्ध झाल्या आहेत. सध्या पदवीधर शिक्षिका म्हणून माणी नंबर १ शाळेत कार्यरत असताना त्यांनी कला, क्रीडा, शैक्षणिक आणि साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. या कार्याची दखल घेत त्यांना रत्नागिरी जिल्हा परिषदेचा सन २०२६-२७ चा ‘आदर्श शिक्षक पुरस्कार’ जाहीर करण्यात आला आहे.
त्यांच्या या यशाबद्दल गृहराज्यमंत्री योगेश कदम, जिल्हा परिषद सदस्य अण्णा कदम, जिल्हा परिषद सदस्य सचिन धाडवे, सभापती आफिया पालेकर, उपसभापती सुनील मोरे, खेड गटविकास अधिकारी विजय करपे, गटशिक्षणाधिकारी गायत्री माने, प्राथमिक शिक्षक पतपेढीचे चेअरमन सुनील दळवी, माजी चेअरमन सुनील सावंत, शिक्षक समिती खेड तालुकाध्यक्ष संतोष चव्हाण आणि संघटना प्रवक्ते शैलेश पराडकर यांनी दिप्ती यादव यांचे अभिनंदन केले आहे.

