( खेड / वार्ताहर )
खेड पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारीपदी संतोष भोसले यांची नुकतीच नियुक्ती झाल्याबद्दल महाराष्ट्र राज्य शिक्षक समिती, शाखा खेड यांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
सत्कार समारंभादरम्यान शिक्षक समितीच्या पदाधिकाऱ्यांनी पदवीधर शिक्षकांच्या प्रलंबित वेतन त्रुटी निश्चितीची प्रक्रिया तातडीने पूर्ण करून प्रस्ताव जिल्हा स्तरावर पाठविण्याची मागणी करणारे लेखी निवेदन गटशिक्षणाधिकारी संतोष भोसले यांना सादर केले.
यावेळी शिक्षक समितीचे तालुकाध्यक्ष संतोष चव्हाण, सचिव धर्मपाल तांबे, जिल्हा उपाध्यक्ष शरद भोसले, जिल्हा प्रतिनिधी राजेश भागणे, कार्याध्यक्ष अनिल यादव, उपाध्यक्ष श्रीकृष्ण खांडेकर, नरेश ठोंबरे, प्रवक्ते शैलेश पराडकर, दिलीप यादव, अजित भोसले, परशुराम पेवेकर, बबन मोरे, गजानन पालांडे, अनंत मोरे, मंगेश वायकर तसेच शिक्षक समितीचे अन्य पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
नूतन गटशिक्षणाधिकारी संतोष भोसले यांच्या नियुक्तीमुळे तालुक्यातील शैक्षणिक क्षेत्राला नवी दिशा मिळेल, असा विश्वास यावेळी उपस्थित शिक्षकांनी व्यक्त केला.

