(संगमेश्वर / प्रतिनिधी)
बावनदी आणि शास्त्री खाडीच्या निसर्गरम्य सान्निध्यात वसलेल्या संगमेश्वर तालुक्यातील परचुरी–शिगवण वाडी येथे ९ मे रोजी भक्ती, गौरव आणि सांस्कृतिक उत्साहाचा संगम अनुभवायला मिळणार आहे. ग्रामविकास मंडळ शिगवण वाडीच्या वतीने आयोजित सार्वजनिक श्री सत्यनारायण महापूजेच्या निमित्ताने यंदाचा प्रतिष्ठेचा ‘कार्याध्यक्ष सन्मान पुरस्कार’ पंचायत समितीचे माजी उपसभापती परशुराम वेलये यांना जाहीर करण्यात आला आहे. त्यांच्या सामाजिक कार्याचा गौरव या सोहळ्यात मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात येणार आहे.
लोकसहभागातून उभारलेला भव्य सभामंडप
ग्रामस्थांच्या लोकसहभागातून आणि दातृत्वातून उभारण्यात आलेल्या भव्य, कायमस्वरूपी सभामंडपाचे उद्घाटनही याच दिवशी पार पडणार आहे. ग्रामविकासाच्या दृष्टीने हा एक महत्त्वाचा टप्पा मानला जात असून, या वास्तूमुळे गावातील सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमांना नवी दिशा मिळणार आहे.
मान्यवरांची उपस्थिती
या सोहळ्याला राज्याचे उद्योगमंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. तसेच उद्योजक रवींद्र सामंत, पंचायत समिती सभापती शर्वरी वेल्ये यांच्यासह राजकीय व सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
दिवसभर विविध कार्यक्रमांची रेलचेल
कार्यक्रमाची सुरुवात धार्मिक विधींनी होणार असून, दिवसभर विद्यार्थ्यांच्या गुणगौरवाचा कार्यक्रम आणि महिलांसाठी हळदीकुंकू समारंभ आयोजित करण्यात आला आहे. सायंकाळी भजनांच्या सुरावटींनी वातावरण भक्तिमय होईल, तर रात्री कोकणातील पारंपरिक ‘बहुरंगी नमन’ कार्यक्रमाने रसिकांचे मनोरंजन होणार आहे.
भाविकांना आवाहन
महाप्रसादासह सर्व कार्यक्रमांचा लाभ घेण्यासाठी परचुरी पंचक्रशीतील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन ग्रामविकास मंडळ शिगवण वाडीच्या वतीने करण्यात आले आहे. हा सोहळा गावाच्या एकतेचा आणि विकासाच्या नव्या वाटचालीचा प्रतीक ठरणार आहे.

