(रत्नागिरी /प्रतिनिधी)
‘रत्नागिरी येथे कामाला जातो,’ असे सांगून घरातून बाहेर पडलेला २८ वर्षीय तरुण त्यानंतर बेपत्ता झाल्याने खळबळ उडाली आहे. अज्ञात व्यक्तीने त्याचे अपहरण करून बेकायदेशीरपणे पळवून नेल्याची फिर्याद नातेवाईकांनी दिली असून, या प्रकरणी पूर्णगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गौरव विठ्ठल पवार (वय २८, रा. उद्यमनगर रोड, बाष्टे कंपाऊंड, रत्नागिरी) असे बेपत्ता तरुणाचे नाव आहे. याबाबत त्याच्या नातेवाईक वृषाली सुरेश कदम (वय ६०, रा. पानगलेवाडी, पावस) यांनी पोलिस ठाण्यात खबर दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गौरव हा १८ सप्टेंबर रोजी दुपारी सुमारे चार वाजण्याच्या सुमारास पानगलेवाडी, पावस येथील घरातून ‘रत्नागिरी येथे कामाला जातो,’ असे सांगून बाहेर पडला. मात्र, त्यानंतर तो घरी परतला नाही. त्याच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला; परंतु त्याचा ठावठिकाणा लागला नाही. गौरवला कोणीतरी अज्ञात व्यक्तीने अपहरण करून बेकायदेशीरपणे पळवून नेल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध भारतीय न्याय संहिता अधिनियम २०२३ मधील कलम १४०(३) अन्वये पूर्णगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गौरवचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू असून, तो नेमका कुठे गेला, त्याच्यासोबत कोण होते आणि त्याच्या बेपत्ता होण्यामागे नेमके कारण काय, याचा तपास पोलिस करीत आहेत.


