( रत्नागिरी / वार्ताहर )
भारतीय जनता पार्टी रत्नागिरीच्या वतीने अनंत चतुर्दशीनंतर रत्नागिरीतील मांडवी समुद्रकिनाऱ्यावर स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. गणेश विसर्जनानंतर समुद्रकिनाऱ्यावर जमा झालेला कचरा आणि अस्वच्छता दूर करण्यासाठी भाजपा पदाधिकारी, महिला कार्यकर्त्या, महाविद्यालयीन विद्यार्थी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने या उपक्रमात सहभागी झाले.
या स्वच्छता मोहिमेत आमदार प्रमोद जठार यांनीही प्रत्यक्ष सहभाग घेत समुद्रकिनाऱ्याची स्वच्छता केली. गणेश विसर्जनानंतर निर्माण झालेला कचरा हटवून मांडवी समुद्रकिनारा स्वच्छ ठेवण्याबरोबरच पर्यावरण संवर्धनाचा संदेश या माध्यमातून देण्यात आला.
भाजपा जिल्हा सरचिटणीस ओंकार फडके, जिल्हा उपाध्यक्ष राजेश भाटलेकर, जिल्हाध्यक्ष वर्षा ताई ढेकणे, मंडल अध्यक्ष दादा ढेकणे यांच्यासह भाजपा पदाधिकारी, महिला कार्यकर्त्या, महाविद्यालयीन विद्यार्थी आणि ग्रामस्थ या मोहिमेत सहभागी झाले होते.
‘स्वच्छ समुद्रकिनारा, सुंदर रत्नागिरी’ या संकल्पनेतून राबविण्यात आलेल्या या स्वच्छता मोहिमेद्वारे समुद्रकिनारे स्वच्छ ठेवण्यासोबतच सामाजिक सहभाग आणि पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.


