(मुंबई / वृत्तसंस्था)
राज्यातील शेतकरी आणि नागरिकांसाठी राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला असून, राज्यातील ३५८ पैकी २६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी हा निर्णय जाहीर केला. त्यामुळे सुमारे ७५ टक्के महाराष्ट्र दुष्काळाच्या कक्षेत आला आहे. दुष्काळी परिस्थितीचा सामना करणाऱ्या शेतकरी आणि नागरिकांना या निर्णयामुळे दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
गेल्या काही दिवसांपासून राज्यातील दुष्काळी परिस्थितीचा पालकमंत्र्यांकडून आढावा घेतला जात होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही दुष्काळी भागाचा दौरा करून परिस्थितीची पाहणी केली होती. याच काळात विरोधकांकडून दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना भरीव मदत देण्याची मागणी करण्यात येत होती. आदित्य ठाकरे यांनी नुकताच दुष्काळग्रस्त भागाचा दौरा केला, तर शरद पवार हेही लवकरच दुष्काळी भागाचा दौरा करणार होते. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने दुष्काळ जाहीर करण्याचा घेतलेला निर्णय महत्त्वाचा ठरला आहे.
दुष्काळ जाहीर झाल्यानंतर संबंधित भागात विविध उपाययोजनांची अंमलबजावणी केली जाणार आहे. त्यामध्ये जमीन महसुलात सूट, पीक कर्जाचे पुनर्गठन आणि शेतीशी निगडित कर्जाच्या वसुलीला स्थगिती देण्याचा समावेश आहे. कृषीपंपांच्या चालू वीजबिलातही सूट देण्यात येणार आहे. ७.५ हॉर्सपॉवर क्षमतेपर्यंतच्या वीजपंपांचे वीजबिल यापूर्वीच माफ करण्यात आले असून, आता त्यापेक्षा अधिक क्षमतेच्या वीजपंपांनाही वीजबिलात सूट दिली जाणार आहे.
दुष्काळी परिस्थितीचा विद्यार्थ्यांवर होणारा परिणाम लक्षात घेऊन शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कातून माफी देण्यात येणार आहे. रोजगार हमी योजनेअंतर्गत नियमांमध्ये शिथिलता आणून अधिकाधिक कामे सुरू करण्यात येणार आहेत. आवश्यक त्या ठिकाणी पिण्याच्या पाण्यासाठी टँकर उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
दुष्काळ जाहीर केलेल्या गावांमध्ये शेतकऱ्यांच्या शेतीपंपाची वीजजोडणी खंडित केली जाणार नाही. शेतीवर आश्रित शेतकरी आणि शेतमजुरांना अन्नधान्य पुरवण्याची व्यवस्था केली जाणार आहे. जनावरांसाठी चाऱ्याची व्यवस्था करण्याबरोबरच जलसंधारणाची कामे मोठ्या प्रमाणावर हाती घेतली जाणार आहेत. पिण्याचे पाणी तसेच जनावरांसाठी पाण्याच्या उपलब्धतेबाबत यापूर्वीच्या आदेशानुसार नियोजन सुरूच ठेवण्यात येणार आहे.
दरम्यान, येत्या ५ ऑक्टोबरपासून पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्यात येणार आहेत. पंचनाम्याची कार्यवाही तत्काळ पूर्ण करण्याचे आदेश सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. पिकांची सद्यस्थिती दर्शविणारे छायाचित्र आणि जीपीएस माहिती संकलित करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन दिवस राज्यातील दुष्काळी भागाची पाहणी केली होती. या दौऱ्यात त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून परिस्थितीची माहिती घेतली आणि त्यांना दिलासा दिला होता. तसेच दोन दिवसांत दुष्काळाचा शासन निर्णय काढण्याचे आश्वासन त्यांनी दिले होते. त्यानंतर आज (शनिवारी) राज्यातील २६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, त्यानुसार विविध दुष्काळी उपाययोजनांची अंमलबजावणी केली जाणार आहे.


