(संगमेश्वर / एजाज पटेल)
संगमेश्वर–बुरंबी रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाल्याने प्रवाशांना आणि वाहनचालकांना अक्षरशः जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत होता. ‘रत्नागिरी 24 न्यूज’ च्या माध्यमातून याबाबत वृत्त प्रसिद्ध झाल्यावर, संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांचे डोळे उघडले असून हे खड्डे भरण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. मात्र, हे काम केवळ थुकपट्टी पद्धतीने होत असल्याने जनतेत तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
संगमेश्वर ते बुरंबी या केवळ सहा ते सात किलोमीटरच्या अंतरातील रस्ता गेल्या काही महिन्यांपासून मोठमोठ्या खड्ड्यांनी भरून गेला आहे. या रस्त्याची अक्षरशः चाळण झाली असून, दुचाकीस्वार आणि प्रवासी यांना दररोज तारेवरची कसरत करावी लागत होती. वारंवार अपघात घडून अनेकांना मोठ्या दुखापतीही झाल्या. नागरिकांनी वारंवार तक्रारी केल्या तरीही संबंधित विभाग आणि लोकप्रतिनिधींकडून कोणतीच ठोस कारवाई केली जात नव्हती.
रस्त्यांना खड्डे, हे तर भ्रष्टाराचे अड्डे!
रत्नागिरी 24 न्यूज ने या रस्त्यावरील भीषण परिस्थितीचे व्हिडिओ, छायाचित्रांसह वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर अखेर बांधकाम विभागाला जाग आली. सध्या लोवले परिसरातून खड्डे भरण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. रस्त्याच्या दुरावस्थेबाबत जनतेतून केली जाणारी सातत्याची ओरड आणि प्रसार माध्यमातून प्रसिद्ध होणाऱ्या वृत्ताची दखल घेऊन सबंधित विभागाकडून गेल्या तीन महिन्यात अनेकदा खड्डे भरण्याचे काम करण्यात आले. खड्डा छोटा असो वा मोठा त्यात जांभ्या दगडाचे तुकडे भरून खड्डे बुजवले जात आहे. मात्र ही केवळ “थुकपट्टी” असून काही दिवसांत पुन्हा हेच खड्डे उघडणार, असा नागरिकांचा आरोप आहे. अनेकांनी तर थुकपट्टी लावून खड्डे भरत असताना सबंधित अधिकाऱ्यांना सुनावले सुद्धा! आज भरलेले खड्डे अवघ्या चार दिवसातच पुन्हा जैसे थे आणि तो रस्ताही पुन्हा तसाच खड्ड्यांचाच राहणार आहे. त्यामुळे खड्डे भरण्याचे हे नाटक नेमके कोणाच्या स्वार्थासाठी आहे, ही ठेकेदार आणि अधिकारी यांची मिलीभगत तर नाही ना? असा प्रश्न जनतेतून विचारला जात आहे. हा प्रकार यापुढे सहन केला जाणार नाही, अशा थुकपट्टी चे प्रकार थांबले नाहीत तर जनआंदोलन उभारण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे.

