(संगमेश्वर / प्रतिनिधी )
हार आणि जित ही होतच असते.यश अपयश या दोन्ही गोष्टी पचवण्याची ताकद खऱ्या अर्थाने विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करण्याची जबाबदारी शिक्षकांवर आहे.कारण अपयश पचवणं कठीण आहेच पण यश टिकवणं हे महाकठीण आहे.हे विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबवलं पाहिजे असे मत सुलभक प्रा प्रभात कोकजे यांनी व्यक्त केले ते रत्नागिरी येथे फाटक हायस्कुल मध्ये सुरू असलेल्या वरिष्ठ श्रेणी प्रशिक्षणात कला,क्रीडा,माध्यमिक व उच्चमाध्यमिक शिक्षकांना मार्गदर्शन करताना बोलत होते.
यावेळी मार्गदर्शन करताना ते पुढे म्हणाले की, शिक्षकाने निवडलेली अध्यापन पद्धतीही वर्गातील शिक्षणप्रक्रिया सहज, आनंददायी होण्यास कारणीभूत असते.यासाठी शिक्षकांना अध्ययन आणि अध्यापन पद्धतीमधील फरकाची जाणीव असणे महत्त्वाचे आहे.शिक्षक विद्यार्थ्यांना वर्गात माहिती देत असतो.ती माहिती तो विद्यार्थी वापरतो तेव्हा त्या माहितीचे रूपांतरण ज्ञानात होते.त्यामुळे शिक्षकाची भूमिका ही अतिशय महत्त्वाची आहे.
विद्यार्थ्यांना आवडेल अशा विविध प्रसंगांची निर्मिती शिक्षकांनी वर्गात करायला हवी जेणे करून अध्ययन अध्यापन प्रक्रिया प्रभावी होऊ शकेल.शिक्षण हा केवळ जीवनाचा एक भाग नाही,तर ते म्हणजेच जीवन ही भावना शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबवायला हवी. राष्ट्राचे भाग्य हे वर्गावर्गात घडवले जाते असे म्हटले जाते.हे खरं, त्यासाठी प्रत्येक शिक्षकाने विकसित राष्ट्र निर्माणाच्या प्रक्रियेमध्ये आवश्यक असणारी सुशिक्षित पिढी कशी घडेल यासाठी प्रयत्न करायला हवेत.तरच राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० यशस्वी होताना दिसेल असा आशावाद व्यक्त केला.
विद्यार्थ्यांना कृती युक्त शिक्षण द्यायला हवे,प्रकल्प कृती यातून विद्यार्थ्यांना रुची निर्माण करण्यास मदत होईल.त्यालाच जोड म्हणून समस्या निराकरण पद्धतीचा अवलंब करायला हवा,यामुळे विद्यार्थ्यांना एखाद्या समस्येवर विविध मार्गाने उपाय शोधणे सोपे जाईल असे नमूद केले. रत्नागिरी येथे सुरू असलेले प्रशिक्षण हे डाएट चे प्राचार्य सुशीलकुमार शिवलकर,राहुल बर्वे,राजेंद्र लठ्ठे,यांच्या मार्गदर्शनासाठी तर अश्विनी काणे ह्या साधनव्यक्ती म्हणून काम पाहत आहेत. तर प्रा प्रभात कोकजे,प्रा सागर पोकळे,प्रा एस आर जोपळे,प्रा सौ मानसी गानू, मोहन बापट,दिगंबर गवळी,वर्षा घाग,विभा बाणे, सुधीर शिंदे,अनंत जाधव,विष्णू पवार,आदी सुलभक म्हणून काम पाहत आहेत.