(गुहागर / रत्नागिरी)
अयोध्येतील राम मंदिरात झालेल्या १,४०० कोटी रुपयांच्या कथित चोरीच्या निषेधार्थ उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतर्फे गुहागर तालुक्यात १८ ते २२ ऑगस्टदरम्यान विविध मंदिरांमध्ये रामरक्षा पठण व आरतीचे आयोजन करण्यात आले आहे. पक्षभेद व राजकीय मतभेद बाजूला ठेवून सर्व रामभक्तांनी या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा परिषद सदस्य विक्रांत जाधव यांनी पत्रकार परिषदेत केले.
आमदार भास्कर जाधव यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती विक्रांत जाधव यांनी दिली. या अंतर्गत १८ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता असगोली येथील हनुमान मंदिरात, दुपारी ३ वाजता अंजनवेल येथील विठ्ठल-रखुमाई मंदिरात आणि सायंकाळी ५.३० वाजता पालपेणे येथील विठ्ठल-रखुमाई मंदिरात रामरक्षा पठण व आरती होणार आहे. १९ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता पिंपर येथील हनुमान मंदिरात, दुपारी २.३० वाजता मुसलोंडी येथील हनुमान मंदिरात, तर सायंकाळी ५.३० वाजता अड्डूर किंवा पालशेत येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. २१ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता आबलोली बाजारपेठेत, दुपारी २.३० वाजता शिवणे येथील सहानेवर, तसेच सायंकाळी चिपळूण येथील वहाळ पट्ट्यात रामरक्षा पठण व आरती होणार आहे. २२ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता शृंगारतळी येथे, तर दुपारी २.३० वाजता पेवे-खारेकोंड येथे हा कार्यक्रम होणार असल्याचे सांगण्यात आले.
“हा उपक्रम केवळ पक्षापुरता मर्यादित नसून श्रद्धा आणि निषेध व्यक्त करण्याचा सामूहिक प्रयत्न आहे. त्यामुळे पक्षभेद आणि राजकारण बाजूला ठेवून रामभक्तांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे,” असे आवाहन विक्रांत जाधव यांनी केले. यावेळी उद्धव सेनेचे तालुकाध्यक्ष सचिन बाईत, माजी नगराध्यक्ष जयदेव मोरे, विनायक जाधव, राज विखारे यांच्यासह पक्षाचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

