(रत्नागिरी /प्रतिनिधी)
चोरीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांच्या हाती लागण्यापूर्वीच फरार झालेल्या संशयिताला रत्नागिरी ग्रामीण पोलिसांच्या पथकाने उत्तर प्रदेशातील किशनपूर तालुक्यातून ताब्यात घेतले. रामहित निषाद असे ताब्यात घेण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे.
रामहित निषाद काही महिन्यांपूर्वी रत्नागिरी येथे मोलमजुरीचे काम करत होता. याच काळात चोरीची घटना घडल्याने त्याच्याविरुद्ध रत्नागिरी ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, गुन्हा दाखल झाल्यानंतर तो पोलिसांच्या हाती लागण्यापूर्वीच फरार झाला. त्यानंतर रत्नागिरी ग्रामीण पोलिसांकडून त्याचा शोध सुरू होता. संशयिताचा ठावठिकाणा शोधण्यासाठी ग्रामीण पोलिसांचे विशेष पथक उत्तर प्रदेशातील किशनपूर येथे रवाना करण्यात आले. पथकातील पोलिस हेड कॉन्स्टेबल गणपत झोरे आणि कॉन्स्टेबल प्रशांत बंडबे यांनी स्थानिक पोलिसांच्या मदतीने शोधमोहीम राबवून रामहित निषादला ताब्यात घेतले.
ताब्यात घेतल्यानंतर संशयिताची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यानंतर पोलिस पथक त्याला घेऊन रत्नागिरीकडे रवाना झाले. मंगळवारी रत्नागिरी ग्रामीण पोलिसांनी रामहित निषाद याला न्यायालयात हजर केले. या कारवाईमुळे गुन्हा दाखल झाल्यानंतर फरार झालेल्या संशयिताला अखेर पोलिसांनी परराज्यातून ताब्यात आणण्यात यश मिळवले आहे.

