(गुहागर)
तालुक्यातील चिखली मांडवकरवाडी येथील स्वप्निल गोपाळ कानसे (वय ३५) या युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी (१८ सप्टेंबर २०२५) सकाळी नऊच्या सुमारास उघडकीस आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वप्निल कानसे हे चिखली येथील ओमकार मंगल कार्यालयात अडीच वर्षांपासून काम करत होते. गुरुवारी सकाळी आठच्या सुमारास त्यांनी नेहमीप्रमाणे सर्व कामगारांना चहा दिला. मात्र, काही वेळानंतर त्यांनी मंगल कार्यालयाच्या किचनमधील सीलिंग फॅनच्या हुकास नायलॉनच्या दोरीने गळफास घेतल्याचे आढळले.
घटनेची माहिती मिळताच स्वप्निल यांना तातडीने चिखली प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले, मात्र तेथे त्यांना मृत घोषित करण्यात आले.
स्वप्निल विवाहित असून त्यांच्या पश्चात आई, पत्नी आणि एक मुलगा असा परिवार आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
या प्रकरणी गुहागर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून, आत्महत्येमागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. अधिक तपास पोलिस निरीक्षक सचिन सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

