( देवळे / प्रकाश चाळके )
मराठी पत्रकार दिनाच्या पूर्वसंध्येला ऑल जर्नालिस्ट अँड फ्रेंड्स सर्कल या राष्ट्रीय पत्रकार संघटनेतर्फे देण्यात येणारे राज्यस्तरीय पत्रकार प्रेरणा पुरस्कार २०२६ जाहीर करण्यात आले आहेत. विविध क्षेत्रांत पत्रकारिता आणि सामाजिक कार्याच्या माध्यमातून उल्लेखनीय योगदान देणाऱ्या पत्रकार व सामाजिक कार्यकर्त्यांची पुरस्कारांसाठी निवड करण्यात आली आहे. संघटनेचे केंद्रीय सचिव अतुल होनकळसे, प्रदेश सरचिटणीस गोविंदसिंग राजपूत, केंद्रीय अध्यक्ष यासिन पटेल आणि प्रदेशाध्यक्ष अॅड. विठ्ठल मोघे यांनी सोमवारी पुरस्कारांची घोषणा केली.
ऑल जर्नालिस्ट अँड फ्रेंड्स सर्कल ही संघटना गेल्या २५ ते ३० वर्षांपासून पत्रकारांच्या विविध प्रश्नांसाठी तसेच सामाजिक बांधिलकीच्या उपक्रमांसाठी कार्यरत आहे. संघटनेतर्फे दरवर्षी पत्रकार दिनाचे औचित्य साधून पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन केले जाते. यंदाचा पुरस्कार वितरण सोहळा मुंबईतील गांधी बुक सेंटर येथे २० ऑगस्ट रोजी दुपारी ३ ते ६ या वेळेत होणार आहे.
यंदा आचार्य बाळशास्त्री जांभेकर दर्पण पुरस्कार नांदेड येथील दैनिक स्वतंत्र वार्ताचे कार्यकारी संपादक कालिदास अनंतोजी यांना जाहीर झाला आहे. संपादक नानासाहेब जोशी यांच्या नावाने देण्यात येणारा पुरस्कार रत्नागिरी येथील वरिष्ठ पत्रकार मकरंद भागवत यांना प्रदान करण्यात येणार आहे. पांडुरंग भटकर यांच्या नावाने देण्यात येणाऱ्या पुरस्कारासाठी बुलढाणा जिल्ह्यातील चिखली येथील श्याम देशमुख यांची निवड करण्यात आली आहे.
हेमंत कुलकर्णी मराठी संपादक पुरस्कारासाठी परभणी जिल्ह्यातील पूर्णा येथील नागनाथ नागठाणे यांची निवड झाली आहे. मधुकर लोंढे स्मृती साप्ताहिक पुरस्कार युवराज धनवडे (दै. पुण्यनगरी, कोल्हापूर) यांना देण्यात येणार आहे. नवीन सोष्टे स्मृती मराठी वार्ताहर पुरस्कारासाठी अकोला येथील बाळकृष्ण नेरकर यांची, तर मधू रावकर शहर वार्ताहर पुरस्कारासाठी ठाणे येथील महादेव माने यांची निवड झाली आहे. जयानंद मठकर पुरस्कारासाठी पुणे येथील अमरसिंग परदेशी यांची निवड करण्यात आली आहे.
शरद दादा बोरकर सामाजिक कार्यकर्ता पुरस्कारासाठी राजू रणवीर यांची, दलित मित्र रमाकांत आरते पुरस्कारासाठी रायगड येथील सुभाष पाटील यांची, तर राज्यस्तरीय दर्पण प्रेरणा पुरस्कारासाठी परभणी येथील मराठवाडा केसरीचे कार्यकारी संपादक सत्यजित गावंडे यांची निवड झाली आहे.
जीवन गौरव पुरस्कारासाठी मालाड येथील निसार अली सय्यद आणि पनवेल येथील संजय कदम यांची निवड करण्यात आली आहे. यंदाच्या पुरस्कारांमध्ये एका नव्या पुरस्काराची भर पडल्याने पुरस्कारांची संख्या वाढली आहे. मुंबईत होणाऱ्या या सोहळ्यात सर्व पुरस्कारार्थींना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.

