( गुहागर )
गुहागर तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा उमराठ क्रमांक १ येथे वरिष्ठ पदवीधर शिक्षक श्री. प्रकाश गणपत नाटेकर यांच्या सेवापूर्तीचा सोहळा मोठ्या उत्साहात व भावनिक वातावरणात पार पडला. श्री. नाटेकर ३० सप्टेंबर २०२५ रोजी नियत वयोमानानुसार ५८व्या वर्षी सेवानिवृत्त झाले. त्यांच्या सन्मानार्थ हा सोहळा दिवाळीपूर्व संध्येला, शुक्रवार दि. १७ ऑक्टोबर २०२५ रोजी पालकवर्ग, ग्रामपंचायत उमराठ आणि शाळा व्यवस्थापन समितीच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान ग्रामपंचायत उमराठचे सरपंच जनार्दन आंबेकर यांनी भूषविले. कार्यक्रमास शाळेचे आजी-माजी विद्यार्थी, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्रीकांत कदम, ग्रामसेवक सिद्धेश्वर लेंडवे, तंटामुक्ती समितीचे माजी अध्यक्ष संदीप गोरिवले, ग्रामस्थ नामदेव पवार, शशिकांत पवार, पुणाजी गावणंग, तसेच महिला पालकवर्ग, अंगणवाडी सेविका आणि मदतनीस मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सत्कारमूर्ती प्रकाश नाटेकर आणि त्यांची पत्नी सौ. पुनम नाटेकर यांचा मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ, साडी आणि विविध भेटवस्तूंनी सत्कार करण्यात आला. पालकवर्गाकडून श्री सरस्वती देवीची मूर्ती, तर अंगणवाडी सेविका सौ. वर्षा पवार यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान दरबाराची सुंदर प्रतिमा भेट म्हणून दिली. विद्यार्थ्यांनीही आपल्या सरांना आठवणींच्या भेटवस्तू अर्पण केल्या. श्री. नाटेकर यांनी प्रत्युत्तरादाखल सर्व विद्यार्थ्यांना पेनसेट भेट देत आपुलकी व्यक्त केली.
शिक्षण क्षेत्रातील चार दशकांचा प्रवास
प्रकाश नाटेकर सरांनी आपल्या शिक्षकी जीवनाची सुरुवात १९८९ साली जयगड पंचक्रोशी हायस्कूल या खाजगी शाळेतून केली. त्यानंतर शासकीय सेवेत प्रवेश करून त्यांनी जि.प. पाचेरी सडा शाळा नं. १, हेदवी शाळा नं. २, चिंद्रावले शाळा नं. १, पिंपर शाळा नं. १, साखरी आगर शाळा नं. १ अशा विविध शाळांमध्ये उत्कृष्ट सेवा दिली. शेवटी जून २०२३ पासून उमराठ शाळा नं. १ येथे कार्यरत राहून ३० सप्टेंबर २०२५ रोजी ३४ वर्षे २ महिन्यांच्या सेवेनंतर सेवानिवृत्त झाले.
शिक्षक म्हणून कार्य करताना नाटेकर सर केवळ अध्यापनापुरते मर्यादित न राहता त्यांनी कला, क्रीडा, संगीत, अध्यात्म आणि समाजकार्य या सर्व क्षेत्रांत सक्रिय सहभाग नोंदविला. ते उत्तम हार्मोनियम वादक असून, उमराठ शाळेतील सर्व सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये त्यांनी सुरेल संगीताने रंगत भरली.
मनोगत आणि शुभेच्छा
कार्यक्रमादरम्यान अनेक मान्यवर, विद्यार्थी व पालकांनी आपल्या मनोगतातून श्री नाटेकर यांच्या सेवाभावी वृत्तीचे आणि व्यक्तिमत्त्वाचे कौतुक केले. सरपंच जनार्दन आंबेकर व शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्रीकांत कदम यांनी त्यांना निरोगी, समाधानपूर्ण आणि आनंदी आयुष्याच्या शुभेच्छा दिल्या.
आपले मनोगत व्यक्त करताना प्रकाश नाटेकर यांनी आपल्या शिक्षकी प्रवासातील अनेक आठवणींना उजाळा देत, उमराठ ग्रामस्थ, शाळा समिती व पालकवर्ग यांचे मनःपूर्वक आभार मानले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन श्री वैभव वासावे यांनी केले, तर श्री अभिषेक नागरगोजे यांनी आभार प्रदर्शनाने सोहळ्याची सांगता केली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संपूर्ण शिक्षकवर्ग, शाळा व्यवस्थापन समिती, तसेच महिला पालकवर्ग यांनी मोलाचे योगदान दिले.

