(गुहागर / रत्नागिरी)
मित्रांसोबत खाडीत पोहण्यासाठी उतरलेल्या ३५ वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना गुहागर तालुक्यातील पडवे-तवसाळ परिसरात रविवारी सायंकाळी घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.संजोग शशिकांत सुर्वे (वय ३५, रा. पडवे भंडारवाडा, ता. गुहागर) असे मृत तरुणाचे नाव आहे. याबाबत गुहागर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संजोग सुर्वे हे त्यांच्या मित्रांसमवेत तवसाळ परिसरात गेले होते. तेथे भोजन केल्यानंतर चौघेजण पडवे येथील महामाई सोनसाखळी गावदेवी मंदिरालगत असलेल्या खाडीजवळ आले. त्यानंतर खाडीच्या पाण्यात पोहण्यासाठी उतरले असता संजोग सुर्वे यांना अचानक पाण्यात गटांगळ्या खायला लागल्या. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात येताच त्यांच्या मित्रांनी तातडीने त्यांना पाण्याबाहेर काढले. बाहेर काढल्यानंतर त्यांच्या नाका-तोंडातून फेस येत असल्याचे दिसून आले.
मित्रांनी प्राथमिक स्वरूपात श्वासोच्छ्वास देण्याचाही प्रयत्न केला. मात्र कोणतीही हालचाल होत नसल्याने त्यांना तातडीने रुग्णवाहिकेद्वारे उपचारासाठी हेदवी येथील सरकारी रुग्णालयात नेण्यात आले. तेथून पुढील उपचारासाठी आबलोली प्राथमिक आरोग्य केंद्रात हलविण्यात आले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले. या घटनेची माहिती मिळताच परिसरात शोककळा पसरली असून गुहागर पोलिसांकडून पुढील कार्यवाही सुरू आहे.

