(गुहागर / वार्ताहर)
गुहागर तालुक्यातील काजुर्ली आणि चिपळूण तालुक्यातील वीर-देवपाट या गावांना जोडणाऱ्या कापशी नदीवरील प्रस्तावित पुलाच्या उभारणीच्या हालचालींना वेग आला आहे. पुलाची आवश्यकता लक्षात घेऊन मंत्रालयस्तरावरून करण्यात आलेल्या सूचनांनुसार बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी प्रस्तावित ठिकाणांची पाहणी केली. गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या मागणीसाठी पंचायत समिती सदस्य संजय जावळे यांच्यासह स्थानिक आणि मुंबईकर ग्रामस्थांनी मंत्रालय पातळीपर्यंत सातत्याने पाठपुरावा केल्याने पुलाच्या उभारणीच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
वीर-काजुर्ली गावांना जोडण्यासाठी कापशी नदीवर पूल उभारण्याची मागणी १९९९ पासून करण्यात येत आहे. यासंदर्भात २००० पासून पत्रव्यवहारही सुरू आहे. सध्या वीर आणि काजुर्ली या दोन्ही गावांदरम्यान नदी ओलांडण्यासाठी नागरिकांना मोठा वळसा घालून प्रवास करावा लागतो. प्रस्तावित पूल उभारल्यास हा प्रवास अधिक सुलभ होणार असून चिपळूण, गुहागर, संगमेश्वर तसेच रत्नागिरी तालुक्यांसह मुंबईकडे जाणाऱ्या नागरिकांनाही त्याचा फायदा होणार आहे.
प्रस्तावित कापशी नदीवरील पुलाची लांबी सुमारे १२० मीटर ठेवण्याचे नियोजन असून त्याची उंची आणि रुंदी आवश्यकतेनुसार निश्चित केली जाणार आहे. पुलासाठी दुपदरी रस्त्याची सुविधा उपलब्ध होणार असून उंच पातळीचा पूल उभारण्याचा प्रस्ताव आहे. त्यामुळे पावसाळ्यात नदीचे पाणी वाढल्यानंतरही वाहतुकीवर परिणाम होणार नाही, अशी अपेक्षा आहे. या मार्गावरील पूल अस्तित्वात आल्यास वीर, काजुर्ली परिसरातील ३५ पेक्षा अधिक गावांसह सुमारे २८ हजारांहून अधिक लोकसंख्येला थेट किंवा अप्रत्यक्ष फायदा होण्याची शक्यता आहे.
चिपळूण-रत्नागिरी प्रवासासाठीही हा पूल पर्यायी आणि महत्त्वाचा दुवा ठरू शकतो. प्रस्तावित पूल उभारल्यानंतर मुंबई-रत्नागिरी मार्गावरील प्रवासासाठीचा अतिरिक्त वळसा वाचण्यास मदत होणार आहे. त्याचबरोबर परिसरातील पर्यटन, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय आणि बाजारपेठेच्या दृष्टीनेही संपर्क अधिक सुलभ होण्याची अपेक्षा आहे.
वीर परिसरातील पर्यटनस्थळे, देवस्थाने, शैक्षणिक संस्था आणि रुग्णालये तसेच चिपळूण, रत्नागिरी, सावर्डे आदी बाजारपेठांशी संपर्क या पुलामुळे सुलभ होईल. विद्यार्थ्यांसह नोकरदार, व्यावसायिक, शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांना त्याचा लाभ होणार आहे.
सहाय्यक अभियंता हर्षवर्धन पवार यांच्यासह बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी कापशी नदीवरील दोन जागांची पाहणी केली. पुलाच्या मागणीसाठी पंचायत समिती सदस्य संजय सोनू जावळे, वीर ग्राम विकास मंडळाचे अध्यक्ष दीपक पवार, मयुरेश गावणंग, परीक्षित पावसकर, विशाल वीरकर, जयंत वीरकर, काजुर्लीचे पप्पू साळवी यांच्यासह वीर, पूर्वे, शिरंबे, वहाळ, पिलवली, तोंडली, अबिटगाव गावांच्या सहकार्यातून सातत्याने पाठपुरावा करण्यात आला.


