(जाकादेवी / संतोष पवार)
रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड शिक्षण संस्थेच्या जाकादेवी येथील तात्यासाहेब मुळ्ये माध्यमिक विद्यालयाचा विद्यार्थी चिंतन दिगंबर घवाळी याने इयत्ता सातवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. चिंतनने तालुका गुणवत्ता यादीत द्वितीय क्रमांक पटकावला असून, जिल्हा गुणवत्ता यादीत ३२वे स्थान मिळवले आहे.
विशेष म्हणजे, चिंतनने यापूर्वी इयत्ता पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेतही गुणवत्ता यादीत दहावे स्थान मिळवत आपल्या गुणवत्तेची चुणूक दाखवली होती. सातवीच्या परीक्षेतील यशामुळे त्याच्या शैक्षणिक गुणवत्तेत सातत्य असल्याचे पुन्हा अधोरेखित झाले आहे.
चिंतनला विद्यालयातील शिक्षक अवधूत जाधव, अमित बोले, हेमराज बहिरम, आकांक्षा कदम, राजेश्री दळवी यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच त्याच्या शैक्षणिक प्रगतीसाठी आई-वडिलांचेही मोलाचे सहकार्य मिळाले.
चिंतनच्या या उल्लेखनीय यशाबद्दल मालगुंड शिक्षण संस्थेचे चेअरमन सुनील ऊर्फ बंधू मयेकर, संस्थेचे सर्व पदाधिकारी व संचालक, जाकादेवी विद्यालयाचे सीईओ किशोर पाटील, मुख्याध्यापक नितीन मोरे, पर्यवेक्षक शाम महाकाळ तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

