(पालघर / वृत्तसंस्था)
विरार परिसरातील खाडी रानगाव येथील कळंब बीचवर शुक्रवारी पर्यटनासाठी आलेला २४ वर्षीय तरुण समुद्राच्या पाण्यात बेपत्ता झाल्याची घटना घडली. सत्य विश्वकर्मा असे बेपत्ता तरुणाचे नाव असून, तो मोतीलाल ओसवाल कंपनीत कार्यरत होता.
मिळालेल्या माहितीनुसार, सत्य विश्वकर्मा हा त्याचा भाऊ शिवा विश्वकर्मा याच्यासोबत शुक्रवारी नालासोपारा येथून कळंब बीचवर फिरण्यासाठी आला होता. दुपारी सुमारे १ वाजता सत्य समुद्राच्या पाण्यात उतरला. याचदरम्यान खाडीच्या चॅनेलमध्ये ‘रिव्हर्स करंट’ म्हणजेच पाण्याचा वेगवान उलटा प्रवाह निर्माण झाला. या प्रवाहाचा अंदाज न आल्याने सत्य पाण्यासोबत समुद्राच्या दिशेने वाहून गेल्याची तीव्र शक्यता वर्तवली जात आहे.
या पाण्याच्या प्रवाहाचा अंदाज न आल्याने सत्य विश्वकर्मा त्यासोबत समुद्राच्या दिशेने वाहून गेल्याची तीव्र शक्यता वर्तवली जात आहे. सत्य पाण्यात वाहून गेल्याचे लक्षात येताच त्याचा भाऊ शिवा विश्वकर्मा याने तातडीने मदतीसाठी टाहो फोडला. त्यानंतर घटनेची माहिती संबंधित यंत्रणांना देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच अर्नाळा सागरी पोलीस आणि वसई-विरार महापालिकेचे अग्निशमन दल तातडीने घटनास्थळी दाखल झाले. बेपत्ता सत्य विश्वकर्माचा शोध घेण्यासाठी समुद्राच्या पाण्यात तसेच किनारपट्टीच्या भागात शोधमोहीम हाती घेण्यात आली.
या घटनेमुळे बीच परिसरात समुद्रात उतरताना विशेष खबरदारी घेण्याचा मुद्दा पुन्हा अधोरेखित झाला आहे. विशेषतः भरतीच्या वेळी आणि खाडीच्या प्रवाहात समुद्रात उतरणे धोकादायक ठरू शकते. त्यामुळे नागरिकांनी आणि पर्यटकांनी समुद्रकिनारी योग्य ती खबरदारी बाळगावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.


