(रत्नागिरी / प्रतिनिधी)
जिल्ह्यातील शाळांमध्ये घटणाऱ्या विद्यार्थीपटाच्या पार्श्वभूमीवर अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. २०२४-२५ या संचमान्यतेनुसार तातडीने समायोजनाची कार्यवाही सुरू करण्याच्या जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या सूचना शिक्षण उपसंचालकांनी स्थगित केल्या आहेत. आगामी २०२५-२६ च्या संचमान्यतेनुसारच समायोजन करावे, असा स्पष्ट आदेश शिक्षण आयुक्तांनी दिल्याने सुरु असलेली प्रक्रिया थांबविण्यात आली आहे.
शासनाच्या पूर्वीच्या निर्देशांनुसार शून्य पटामुळे बंद झालेल्या शाळांतील तसेच अतिरिक्त घोषित झालेल्या शिक्षकांचे तालुका पातळीवर समुपदेशनाद्वारे समायोजन करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार काही तालुक्यांत प्राथमिक कार्यवाहीही सुरू झाली होती. मात्र २०२५-२६ च्या ऑनलाईन संचमान्यता अंतिम टप्प्यात असल्याने अल्पावधीतच फेरसमायोजन अपरिहार्य होणार असल्याचे लक्षात येताच आधीची प्रक्रिया तातडीने थांबवण्यात आली.
या निर्णयामुळे शिक्षकांमध्ये मोठी अस्वस्थता निर्माण झाली आहे. जिल्ह्यात २० पेक्षा कमी विद्यार्थीसंख्या असलेल्या शाळांची संख्या लक्षणीय असून त्यातून ९०० हून अधिक शिक्षक अतिरिक्त ठरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. समायोजन प्रक्रिया स्थगित झाल्याने काही प्रमाणात दिलासा मिळाला असला तरी ती पुन्हा महिनाभरानंतर सुरू होणार असल्याने अनेक शिक्षकांचे भविष्य पुन्हा अनिश्चिततेत लोटले आहे.
२० पेक्षा कमी पटसंख्येच्या शाळांबाबत सरकारने कठोर निर्णय घेऊ नये, किमान कोकणाला यातून सूट मिळावी, अशी मागणी वारंवार झाली आहे. मात्र ती मान्य झालेली नाही. शिक्षण विभागाने नव्या संचमान्यतेनंतरच समायोजन प्रक्रिया राबवण्याचा निर्णय घेतला असून, त्यानंतरच तालुका स्तरावरील समुपदेशनाची पुढील पावले निश्चित केली जाणार आहेत. त्यामुळे शिक्षकांचे समायोजन आता प्रत्यक्षात २०२५-२६ च्या संचमान्यतेनुसारच होणार आहे, हे निश्चित झाले आहे.

