(रत्नागिरी)
राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांची जयंती तसेच, १ ऑक्टोबर ते ७ ऑक्टोबर सुरू असलेल्या वन्यजीव सप्ताहानिमित्त विभागीय वनाधिकारी श्रीमती गिरीजा देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली वनविभाग व निसर्ग सोबती, सह्याद्री संकल्प सोसायटी यांच्या वतीने नेचर ट्रेलचे आयोजन शहराजवळील पोमेंडी येथील श्री महालक्ष्मी मंदिर परिसरातील देवराईत करण्यात आले होते.
यामध्ये निसर्ग सोबतीमधील पक्षी अभ्यासक विराज आठल्ये व अक्षय तोंडवळकर यांनी परिसरात आढळणाऱ्या पक्षी, कीटक, मधमाशी, झाडे, वेली यांबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले. तसेच मानवासाठी निसर्ग किती महत्त्वाचा आहे हे पटवून दिले. या निसर्ग सफारीमध्ये रत्नागिरी परिक्षेत्र वन अधिकारी प्रकाश सुतार, सहाय्यक जिल्हा नियोजन अधिकारी सुचित वंजारी, रत्नागिरी जिल्हा सांख्यिकी कार्यालयाचे उपसंचालक निवास यादव, वनपाल (पाली) न्हानू गावडे, लेखापाल तानाजी पाटील, लिपिक अनिकेत चौगुले, आकाशवाणीचे वार्ताहर अनिकेत कोनकर, प्रवीण साळुंखे, प्रभात गांगण आदी सहभागी झाले होते.
उपस्थितांना प्रकाश सुतार यांनी निसर्गामध्ये वन्य प्राण्यांचे महत्त्व व गरज याबाबत माहिती देऊन उपस्थितांचे आभार मानले. वन्यजीव व वनस्पती नष्ट होणार नाही, पाणी प्रदूषण, हवा प्रदूषण होणार नाही याकडे सर्वांनी सतर्क राहून लक्ष दिले पाहिजे व वन्यजीव वनस्पती याचे संवर्धन संरक्षण केले पाहिजे, असे आवाहन वन विभाग व निसर्ग सोबती, सह्याद्री संकल्प सोसायटी रत्नागिरी यांच्या वतीने करण्यात आले.