( संगमेश्वर / वार्ताहर )
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ वरील धामणी येथे डिव्हायडर अचानक बंद करण्यात आल्याने एका कारचालकाला मार्गाचा अंदाज आला नाही, त्यामुळे कार फसल्याची घटना घडली आहे. महामार्गावरील वाहतूक व्यवस्थेत अचानक करण्यात आलेल्या या बदलामुळे वाहनचालकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
धामणी येथे डिव्हायडर बंद करताना वाहनचालकांना पूर्वसूचना देण्यासाठी आवश्यक सूचना किंवा दिशादर्शक फलक लावण्यात आला नव्हता, तसेच डिव्हायडर बंद केलेल्या ठिकाणी पुरेसे बॅरिकेड्स, रिफ्लेक्टर किंवा इतर सुरक्षा उपाययोजना करण्यात आलेल्या नसल्याने वाहनचालकांना विशेषतः रात्रीच्या वेळी रस्त्याचा अंदाज घेणे कठीण होत आहे.
महामार्गावर वेगाने वाहने धावत असताना अशा प्रकारे अचानक वाहतूक व्यवस्थेत बदल केल्यास गंभीर अपघात होण्याची शक्यता असते. मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाची कामे विविध ठिकाणी सुरू असल्याने वाहनचालकांना आधीच अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यातच डिव्हायडर अचानक बंद करणे, पर्यायी मार्गाची स्पष्ट माहिती न देणे आणि आवश्यक सुरक्षा उपाययोजना न करणे यामुळे धोका आणखी वाढला आहे.
डिव्हायडर बंद करण्यापूर्वी वाहनचालकांना स्पष्ट माहिती देणारे सूचना व दिशादर्शक फलक लावावेत. तसेच संबंधित ठिकाणी बॅरिकेड्स, रिफ्लेक्टर आणि रात्रीच्या वेळी पुरेशी प्रकाशयोजना करावी, अशी मागणी वाहनचालक आणि ग्रामस्थांकडून होत आहे. महामार्गावरील कामांदरम्यान वाहनचालकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देऊन आवश्यक उपाययोजना करण्यात याव्यात, अशी अपेक्षाही व्यक्त केली जात आहे.

