(रत्नागिरी / प्रतिनिधी)
शहरातील मारुती मंदिर सर्कल परिसरात झालेल्या अपघातात दुचाकीस्वार जखमी झाला असून, या प्रकरणी अज्ञात महिला कारचालकाविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुरुवारी सकाळी ही घटना घडली.
या बाबत रघुनाथ बाबी झोरे (वय ४९, रा. हिंदू कॉलनी, रत्नागिरी) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी झोरे हे गुरुवारी सकाळी आपल्या दुचाकीवरून खेडशीहून मारुती मंदिरकडे येत होते. त्याच सुमारास एक अज्ञात महिला तिच्या ताब्यातील कार भरधाव वेगाने मारुती मंदिर ते नाचणे या दिशेने नेत होती. दोन्ही वाहने मारुती मंदिर सर्कल येथे पोहोचताच कारने दुचाकीला जोरदार धडक दिली.
धडकेच्या तीव्रतेमुळे झोरे हे दुचाकीसह रस्त्यावर पडले आणि त्यांच्या उजव्या हाताला दुखापत झाली. अपघातानंतर संबंधित महिला चालकाने झोरे यांची माफी मागितली, मात्र कोणतीही मदत न देता आणि अपघाताची माहिती न देता ती घटनास्थळावरून निघून गेली. या घटनेनंतर झोरे यांनी शहर पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी अज्ञात महिला कारचालकाविरोधात संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल केला असून, तिचा शोध सुरू आहे.

