(रत्नागिरी / प्रतिनिधी)
जिल्ह्यातील नगर परिषद व नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या रणधुमाळीला अत्युच्च टप्पा आला असून, प्रचार थांबण्यास अवघे काही तास शिल्लक असताना राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. महायुती–महाआघाडी, राष्ट्रवादीचे दोन्ही गट, भाजप, शिवसेनेचे दोन्ही गट आणि स्थानिक आघाड्यांचा बहुमेरिय संघर्ष जिल्ह्यात रंगला आहे. मात्र या राजकीय चुरशीइतकाच घराणेशाही आणि रक्ताच्या नात्यांचा प्रभाव ही निवडणूक वैशिष्ट्य म्हणून पुढे आला आहे. कोकणातील अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांत पती–पत्नी, आई–मुलगा, भाऊ–बहीण, सासू–सून, जावा–जावा असे थेट नात्यांचे उमेदवार एकाच वेळी मैदानात आहेत.
पती–पत्नीपासून आई–मुलापर्यंत समोरासमोर लढती
रत्नागिरी नगर परिषदेच्या १६ प्रभागांत ३२ उमेदवारांची निवड होणार असून युती–आघाड्यांमध्ये चांगलीच लगबग आहे. येथे माजी नगरसेविका वैभवी खेडेकर व त्यांचे पती विजय खेडेकर निवडणूक रिंगणात आहेत. माजी नगरसेविका उज्ज्वला शेट्ये आणि विरोधी गटातून त्यांचे सून–जावईसारखे असलेले कौसल्या व केतन शेट्ये पुन्हा मतदारांच्या कसोटीवर आहेत. आई राष्ट्रवादीतून तर मुलगा शिवसेना (उद्धव) गटातून उभा असल्याचे दृश्य राजकीय चर्चेला अधिकच उधाण देत आहे.
प्रभाग १३ मध्ये ‘जाऊबाईं’ची थेट लढत
रत्नागिरीत प्रभाग १३ सर्वाधिक चर्चेत आहे. येथे शिंदे गटाने पल्लवी महाडिक यांना, तर उद्धव ठाकरे गटाने श्वेता महाडिक यांना उमेदवारी दिली आहे. पक्ष वेगळा, घर एकच अशी स्थिती निर्माण झाल्याने या ‘जाऊबाईंच्या’ लढतीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष आहे.
आई नगराध्यक्षपदासाठी तर मुलगा नगरसेवकपदी
राजापूर नगरपरिषदेतील लढतीही नात्यांच्या प्रभावाने गाजत आहेत. माजी आमदार हुस्नबानू खलिफे नगराध्यक्षपदासाठी तर त्यांचा मुलगा जमीर खलिफे नगरसेवकपदासाठी रिंगणात आहे. याशिवाय सौरभ खडपे आणि त्यांची बहीण उर्मिला बाकाळकर यांनाही उमेदवारी मिळाल्याने घरातीलच दंगल राजकीय पातळीवर दिसत आहे.
एकाच कुटुंबातील आई, मुलगी, दीर, पती–पत्नींची रांग
लांजा नगरपंचायत निवडणुकीत बंडखोरी, स्थानिक आघाड्या आणि कुटुंबशाहीचा संगम पाहायला मिळत आहे. येथे नगराध्यक्षपदासाठी प्रियांका यादव रिंगणात असून त्यांच्या आई वंदना काटगाळकर, दीर किशोर यादव, तसेच शीतल सावंत–अवंतिका सावंत ही आई–मुलगी जोडीही लढत आहे. मिलिंद व मधुरा लांजेकर हे दांपत्य देखील निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहे.
जावा–जावा, सासू–सून समोरासमोर
देवरुख नगरपंचायतीत कौटुंबिक संघर्षाची सर्वाधिक उदाहरणे दिसत आहेत. प्राची भुवड (राष्ट्रवादी–अजित गट) आणि शर्मिला भुवड (उद्धव सेना) या नात्याने जावा–जावा, परंतु राजकीयदृष्ट्या कट्टर प्रतिस्पर्धी ठरल्या आहेत. तर नेहा आंबेकर (शिंदे सेना) व मनस्वी आंबेकर (अपक्ष) या सासू–सून जोडीही एकमेकींसमोर उभ्या ठाकल्या आहेत.
पिता–पुत्र, पती–पत्नींचा राजकीय संघर्ष
गुहागरमध्ये शिंदे गटाचे राजेंद्र भागडे आणि त्यांचे पुत्र सौरभ भागडे यांनी सुरुवातीला एकाच प्रभागातून उमेदवारी भरली होती. अखेर मुलाने प्रभाग बदलत हा पिता–पुत्र संघर्ष टाळला असला तरी दोघेही वेगवेगळ्या प्रभागांत, वेगवेगळ्या पक्षातून अखाड्यात आहेत.
उद्धव गटाकडून रिद्धी रहाटे आणि त्यांचे पती प्रवीण रहाटे या दांपत्यानेही निवडणुकीत उडी घेतली आहे.
चार दांपत्यांची जोरदार एन्ट्री
खेड नगरपालिका निवडणुकीत तब्बल चार दांपत्यांनी अर्ज भरला आहे. सपना–ऋषिकेश कानडे, ओंकार–रूपाली कुलकर्णी, सुरभी–सुनील धामणस्कर, बशीर–कौसर मुजावर ही दांपत्ये विविध पक्षांतून आपले नशीब आजमावत आहेत. तसेच अजित पवार गटातील अनिल सदरे यांच्या पत्नी अपेक्षा सदरेही उमेदवारीवर आहेत.
कौटुंबिक राजकारणाची सरशी की मतदारांचा निर्णय?
जिल्ह्यातील जवळपास सर्वच नगर परिषद व नगरपंचायतींमध्ये रक्ताच्या नात्यांचा प्रभाव स्पष्टपणे जाणवत असला तरी, या कुटुंबशाहीवर जनतेची शिक्कामोर्तब होणार की नकार हे आगामी मतदान व निकाल जाहीर झाल्यावरच समोर येणार आहे.
फक्त दोन दिवसांत मतदान होणार असून त्यानंतरच्या दिवशी निकाल जाहीर होणार असल्याने अंतिम क्षणांतील राजकीय उलटफेरांवर सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत.

