(रत्नागिरी / वार्ताहर)
आर्थिक परिस्थितीमुळे कोणत्याही गुणवंत विद्यार्थ्याच्या शिक्षणात अडथळा येऊ नये, या सामाजिक बांधिलकीतून जिल्हा परिषद सदस्य महेश उर्फ बाबू म्हाप यांनी गुणवंत व होतकरू विद्यार्थ्यांसाठी आर्थिक मदतीची घोषणा केली. कुणबी विद्यार्थी गुणगौरव सोहळ्यात त्यांनी या उपक्रमासाठी ५१ हजार रुपयांची देणगी जाहीर केली.
याचवेळी न्यू इंग्लिश स्कूल, पालीचा गुणवंत विद्यार्थी यश मधुकर घडशी याने इयत्ता दहावीच्या परीक्षेत ९७ टक्के गुण मिळवत उल्लेखनीय यश संपादन केल्याबद्दल त्याचा गौरव करण्यात आला. यशच्या पुढील उच्च शिक्षणासाठी लागणारा संपूर्ण शैक्षणिक खर्च उचलण्याची जबाबदारी महेश उर्फ बाबू म्हाप यांनी स्वीकारली. त्यांच्या या निर्णयामुळे गुणवंत विद्यार्थ्याला उच्च शिक्षणासाठी मोठा आधार मिळाला असून, त्यांच्या सामाजिक बांधिलकीचे उपस्थितांनी कौतुक केले.
यावेळी बोलताना म्हाप यांनी विद्यार्थ्यांनी आर्थिक परिस्थितीचा अडथळा न मानता मोठी स्वप्ने पाहावीत आणि उच्च शिक्षण घेऊन कुटुंबासह समाजाचे नाव उज्ज्वल करावे, असे आवाहन केले. गुणवंत तसेच गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला हातभार लावण्यासाठी समाजातील सक्षम व्यक्तींनी पुढे येण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, पंचायत समिती सभागृह तसेच जिल्हा परिषद सभागृहात कुणबी समाजाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाल्याबद्दल त्यांनी समाजबांधवांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. समाजाने दाखविलेला विश्वास ही आपली जबाबदारी असून, भविष्यातही समाजाच्या शैक्षणिक आणि सामाजिक प्रगतीसाठी योगदान देत राहण्याची ग्वाही त्यांनी दिली.
महेश उर्फ बाबू म्हाप यांच्या या उपक्रमामुळे आर्थिक अडचणींमुळे शिक्षणापासून दूर जाणाऱ्या विद्यार्थ्यांना आधार मिळणार असून, गुणवंत विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणाला आर्थिक बळ देण्याबरोबरच समाजातील इतर विद्यार्थ्यांनाही प्रोत्साहन मिळणार आहे.

