(गणपतीपुळे / वैभव पवार)
प्रहार सामाजिक संघटनेच्या पुढाकाराने आणि जिजाऊ सामाजिक व शैक्षणिक संस्थेच्या सहकार्याने रत्नागिरी तालुक्यातील जयगड-नांदिवडे परिसरातील नागरिकांसाठी मोठी आरोग्यसुविधा उपलब्ध होणार आहे. जिंदल कंपनीच्या माध्यमातून या परिसरात लवकरच सुसज्ज मल्टीस्पेशालिटी मोफत रुग्णालय उभारण्यात येणार आहे. त्यामुळे जयगड, नांदिवडे तसेच पंचक्रोशी आणि दशक्रोशीतील नागरिकांना दर्जेदार उपचारांची सुविधा मोफत उपलब्ध होणार आहे.
गेल्या सुमारे २० वर्षांपासून परिसरातील ग्रामस्थांच्या मनात असलेले रुग्णालयाचे स्वप्न आता प्रत्यक्षात येण्याच्या मार्गावर आहे. स्थानिक नागरिकांसह जिंदाल कंपनीतील कामगारांना त्यांच्या घराजवळच चांगल्या आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. येत्या सहा महिन्यांत रुग्णालयाच्या उभारणीला मूर्त स्वरूप येण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
प्रहार सामाजिक संघटनेचे संस्थापक बच्चूभाऊ कडू आणि जिजाऊ सामाजिक व शैक्षणिक संस्थेचे संस्थापक निलेश सांबरे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रहार संघटनेच्या कोकण विभाग अध्यक्षा काजलताई परेश नाईक आणि जिजाऊ संस्थेचे सचिव केदार चव्हाण यांनी जिंदल कंपनीचे अधिकारी अनिल दधीच आणि त्यांच्या सहकाऱ्यांसोबत नुकतीच विशेष बैठक घेतली.
या बैठकीत रुग्णालय उभारणीबाबत सकारात्मक चर्चा झाली. लवकरच जिंदल कंपनी आणि जिजाऊ संस्थेदरम्यान आवश्यक करार करण्यात येणार असून, त्यानंतर रुग्णालय उभारणीच्या कामाला सुरुवात होणार असल्याचे सांगण्यात आले.
या उपक्रमामुळे जयगड-नांदिवडे परिसरातील नागरिकांना महागड्या उपचारांसाठी दूरच्या शहरांमध्ये जाण्याची गरज कमी होणार असून, त्यांच्या घराजवळच विविध आजारांवर दर्जेदार उपचार मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. या महत्त्वपूर्ण उपक्रमाची माहिती प्रहार सामाजिक संघटनेच्या रत्नागिरी महिला अध्यक्षा आरती सुर्वे यांनी दिली.

