(गणपतीपुळे / वैभव पवार)
रत्नागिरी तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आणि लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री क्षेत्र गणपतीपुळे येथे मंगळवार, २९ सप्टेंबर रोजी अंगारकी चतुर्थी यात्रोत्सव उत्साहात पार पडला. यानिमित्त घाटमाथा तसेच विदर्भातील हजारो भाविकांनी गणपतीपुळे येथे उपस्थित राहून स्वयंभू श्रींचे श्रद्धापूर्वक दर्शन घेतले.
यंदा २०२६ मधील तिसरी अंगारकी चतुर्थी असल्याने गणपतीपुळे येथे मोठी गर्दी होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता.
मात्र, यंदा महाराष्ट्रावर दुष्काळाचे सावट, नुकताच पार पडलेला गणेशोत्सव आणि सुरू झालेला पितृपंधरवडा यामुळे अंगारकी चतुर्थी यात्रोत्सवातील भाविकांच्या गर्दीवर परिणाम झाल्याचे गणपतीपुळे मंदिराचे मुख्य पुजारी अमित घनवटकर यांनी सांगितले. यंदा भाविकांच्या संख्येत ३५ ते ४० टक्के घट झाल्याचे चित्र दिसून आल्याचे त्यांनी नमूद केले.
अंगारकी चतुर्थीनिमित्त सुमारे ७० ते ८० हजार भाविक उपस्थित राहतील, असा अंदाज होता. मात्र प्रत्यक्षात सुमारे ४० ते ५० हजार भाविकांनी स्वयंभू श्रींचे दर्शन घेतले. गर्दी कमी असली तरी यंदाच्या अंगारकी चतुर्थीनिमित्त गणपतीपुळे येथे आलेल्या भाविकांच्या प्रार्थनेत महाराष्ट्रावरील दुष्काळाचे सावट दूर होऊन शेतकऱ्यांना सुगीचे दिवस यावेत, अशी भावना प्रकर्षाने दिसून आली.
घाटमाथा आणि विदर्भातून आलेल्या भाविकांनी स्वयंभू श्रींच्या चरणी महाराष्ट्रावरील दुष्काळाचे संकट दूर होऊ दे आणि शेतकऱ्यांना सुगीचे दिवस येऊ दे, असे साकडे घातल्याचे मुख्य पुजारी अमित घनवटकर यांनी सांगितले. दर्शनासाठी आलेल्या अनेक भाविकांकडूनही दुष्काळ निवारणासाठी श्रींच्या चरणी प्रार्थना केली जात असल्याचे चित्र पाहायला मिळाले.
अंगारकी चतुर्थीनिमित्त गणपतीपुळ्यात दाखल झालेल्या भाविकांनी स्वयंभू श्रींचे दर्शन घेत आपल्या इच्छा-आकांक्षा पूर्ण होण्यासाठी मनोकामना व्यक्त केली. त्याचबरोबर संपूर्ण महाराष्ट्रावर आलेले दुष्काळाचे संकट दूर व्हावे आणि शेतकऱ्यांना सुगीचे दिवस यावेत, यासाठीही भाविकांनी श्रींच्या चरणी प्रार्थना केली.


