(चिपळूण)
तनाळी येथे विहिरीत पडलेल्या मादी बिबट्याची वन विभागाच्या बचाव पथकाने सुटका केली. ही घटना मंगळवारी सकाळी घडली. तनाळी रामवाडी येथे २ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजता प्रभाकर बाबाजी जावळे यांच्या विहिरीत बिबट्या पडल्याची माहिती सरपंच विजय बोंबले यांनी वनपाल सत्ताप्पा सावंत (चिपळूण) यांना दूरध्वनीद्वारे दिली.
माहिती मिळताच वन विभागाचे वन्यप्राणी बचाव पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. सहायक वनसंरक्षक श्रीम. प्रियंका लगड यांच्यासह पथकाने परिस्थितीचा आढावा घेतला. विहीर अंदाजे ४० फूट खोल असून त्यात सुमारे १० फूट पाणी होते. बिबट्या भक्ष्याचा पाठलाग करत असताना पहाटेच्या सुमारास विहिरीत पडल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
पिंजरा व दोरीच्या सहाय्याने वन कर्मचाऱ्यांनी ग्रामस्थांच्या मदतीने बचावकार्य सुरू केले. विहीर खोल असून पाण्याचा स्तर असल्याने बचाव प्रक्रिया आव्हानात्मक होती. अखेर एक तासाच्या अथक प्रयत्नानंतर बिबट्याला सुरक्षितपणे पिंजऱ्यात घेण्यात बचाव पथकाला यश आले.
पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. काणसे यांनी तपासणी केली असता बिबट्या मादी असून वय साधारण १.५ ते २ वर्षे असल्याचे स्पष्ट झाले. ती पूर्णपणे सुस्थितीत असल्याची खात्री झाल्यानंतर वन विभागाने तिला नैसर्गिक अधिवासात पुन्हा सोडून दिले.
बचाव पथकात सहभागी अधिकारी व कर्मचारी:
श्री. सरवर खान (वनपरिक्षेत्र अधिकारी, चिपळूण), श्री. सत्ताप्पा सावंत (वनपाल, चिपळूण), अनंत मंत्रे (वनरक्षक, पोफळी),
दत्ताराम सुर्वे, प्रणीत कोळी, विशाल पाटील (फिरते पथक, रत्नागिरी-चिपळूण), वाहनचालक नंदकुमार कदम, मदतनीस संजय आंबोकर तसेच तनाळीचे सरपंच, पोलीस पाटील आणि गावकऱ्यांनी सक्रिय सहकार्य केले.
सदर बचाव मोहिमेला श्रीम. गिरीजा देसाई (विभागीय वन अधिकारी), श्रीम. प्रियंका लगड (सहायक वनसंरक्षक) आणि श्री. सरवर खान यांचे मार्गदर्शन लाभले.
वन विभागाचे आवाहन:
मानवी वस्तीमध्ये किंवा संकटात सापडलेला कोणताही वन्यप्राणी दिसल्यास तात्काळ टोल फ्री क्रमांक १९२६ वर संपर्क साधावा, असे आवाहन वन विभागाने केले

