(जाकादेवी / संतोष पवार)
रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड शिक्षण संस्थेच्या जाकादेवी येथील तात्यासाहेब मुळ्ये माध्यमिक विद्यालय व बाबाराम पर्शराम कदम कनिष्ठ महाविद्यालयाच्या दोन खेळाडूंनी जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करत राज्यस्तरीय स्पर्धेसाठी आपले स्थान निश्चित केले आहे. कुमारी तनुजा हर्षल घाणेकर आणि कुमार तन्मय हर्षल घाणेकर यांची १८ वर्षांखालील गटातील लांब उडी या क्रीडा प्रकारात राज्यस्तरावर निवड झाली आहे.
रत्नागिरी जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनतर्फे चिपळूण तालुक्यातील डेरवण येथील स्पोर्ट्स अकॅडमीमध्ये जिल्हा अजिंक्यपद व निवड चाचणी स्पर्धा नुकतीच पार पडली. या स्पर्धेत तनुजा घाणेकर हिने लांब उडीमध्ये प्रथम क्रमांक, तर तन्मय घाणेकर याने द्वितीय क्रमांक मिळवला. त्यांच्या या दमदार कामगिरीमुळे दोघांचीही राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. याच स्पर्धेत विद्यालयातील कार्तिकी प्रविण कांबळे आणि आदर्श दीपक मायंगडे यांनीही लांब उडी या क्रीडा प्रकारात जिल्हास्तरावर उल्लेखनीय कामगिरी केली.
या सर्व खेळाडूंना विद्यालयाचे क्रीडाशिक्षक किशोर नलवडे आणि संतोष सनगरे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल मालगुंड शिक्षण संस्थेचे चेअरमन सुनील ऊर्फ बंधू मयेकर, उपाध्यक्ष विवेक परकर, सचिव विनायक राऊत, खजिनदार संदीप कदम, जाकादेवी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे सीईओ किशोर पाटील, मुख्याध्यापक नितीन मोरे, पर्यवेक्षक शाम महाकाळ, ज्येष्ठ शिक्षक अरुण कांबळे, सांस्कृतिक विभागप्रमुख संतोष पवार, क्रीडाशिक्षिका सौ. मनिषा धोंगडे तसेच सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी अभिनंदन केले असून, राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

