(रत्नागिरी /प्रतिनिधी)
शहरातील गजबजलेल्या आठवडा बाजार परिसरात खरेदीसाठी आलेल्या एका वृद्ध पादचाऱ्यास अज्ञात महिला दुचाकीस्वाराने धडक दिल्याची घटना शनिवारी रात्री घडली. या अपघातात वृद्धाच्या पायाला गंभीर दुखापत झाली असून, त्यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अनंत तानाजी सनगरे (वय ६५, रा. फणसवळे, रत्नागिरी) असे जखमी वृद्धाचे नाव आहे. शनिवारी (ता. २) सायंकाळी आठच्या सुमारास शहरी बसस्थानकासमोरील रस्त्यावर हा अपघात घडला.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आठवडा बाजाराच्या निमित्ताने सनगरे हे खरेदीसाठी शहरात आले होते. खरेदी आटोपून एसटीने घरी परतण्यासाठी ते बसस्थानकाच्या दिशेने जात असताना, समोरून येणाऱ्या अज्ञात महिला दुचाकीस्वाराने त्यांना जोरदार धडक दिली. धडकेनंतर सनगरे रस्त्यावर कोसळले आणि त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली. घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी तत्काळ मदत करत त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. या प्रकरणी जिल्हा रुग्णालयातील पोलिस चौकीत नोंद करण्यात आली असून, शहर पोलिस ठाण्यात अज्ञात महिला दुचाकीस्वाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.

