(मुंबई)
राज्यात प्रलंबित ‘ई-चलान’ दंड वसुली करताना वाहनचालकांवर कोणत्याही प्रकारची जबरदस्ती करू नये, असे स्पष्ट निर्देश वाहतूक विभागाकडून पोलिसांना देण्यात आले आहेत. दंड भरण्यासाठी वाहनचालकांना धमकावणे, उद्धटपणे वागणे किंवा वाहन जप्तीची भीती दाखवणे आढळल्यास संबंधित पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांवर थेट शिस्तभंगाची कारवाई केली जाईल, असा इशारा देण्यात आला आहे.
राज्यात सध्या प्रलंबित ई-चलान दंड वसुलीसाठी वाहतूक पोलिसांकडून विशेष मोहीम सुरू आहे. मात्र या मोहिमेदरम्यान अनेक ठिकाणी वाहनचालकांना रस्त्यात अडवून “दंड लगेच भरा, अन्यथा वाहन किंवा कागदपत्रे जप्त करू” अशी दमदाटी केल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या. या तक्रारींची गंभीर दखल घेत गृह विभागाने सर्व पोलीस घटकांना स्पष्ट सूचना जारी केल्या आहेत.
‘एसओपी’चे पालन बंधनकारक
वाहतूक विभागाने ई-चलान दंड वसुलीसाठी यापूर्वीच आदर्श कार्यप्रणाली (SOP) लागू केली आहे. या नियमानुसार, वाहनचालक स्वेच्छेने दंड भरण्यास तयार असेल तरच तो स्वीकारावा. वाहन जप्त करण्यासारखी कारवाई केवळ न्यायालयाच्या आदेशानंतरच करता येईल. तसेच वाहनचालकांशी नम्रपणे वागणे बंधनकारक असल्याचेही सूचनांमध्ये नमूद आहे.
नियम मोडल्यास थेट कारवाई
काही ठिकाणी वरिष्ठांच्या सूचनांकडे दुर्लक्ष करून नागरिकांना अनावश्यक त्रास दिला जात असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे पोलिसांची प्रतिमा मलिन होत असल्याचेही नव्या परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे. या निर्देशांचे उल्लंघन करणाऱ्या पोलीस अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांवर तात्काळ शिस्तभंगाची कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

