(मुंबई / वार्ताहर)
गणपती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणात येणाऱ्या चाकरमानी आणि प्रवाशांसाठी मोठी दिलासादायक बातमी आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते रत्नागिरी दरम्यान धावणाऱ्या 01153/01154 गणपती स्पेशलला कडवई रेल्वे स्थानकावर थांबा मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे कडवई परिसरासह संगमेश्वर तालुक्यातील रेल्वे प्रवाशांची मोठी सोय होणार आहे.
कडवई रेल्वे स्थानकावर गणपती स्पेशलला थांबा मिळावा, यासाठी ‘निसर्गरम्य चिपळूण आणि संगमेश्वर रेल्वे’ फेसबुक ग्रुपचे प्रमुख संदेश जिमन यांनी कोकण रेल्वेकडे निवेदन सादर करून मागणी केली होती. गणपती उत्सवाच्या काळात मुंबईसह विविध शहरांमधून मोठ्या संख्येने चाकरमानी कोकणात येतात. त्यामुळे कडवई स्थानकावर विशेष गाडीला थांबा मिळाल्यास स्थानिक प्रवाशांना मोठा फायदा होईल, या उद्देशाने ही मागणी करण्यात आली होती.
या मागणीसाठी सातत्याने करण्यात आलेल्या पाठपुराव्याला अखेर यश आले आहे. आमदार शेखर निकम यांनीही कडवई रेल्वे स्थानकावर गणपती स्पेशलला थांबा मिळावा, यासाठी कोकण रेल्वेकडे पत्राद्वारे मागणी केली होती. त्यांच्या या पाठपुराव्यामुळेही मागणीला बळ मिळाले.
कडवई स्थानकावर गणपती स्पेशलला थांबा मंजूर झाल्याने कडवई परिसरातील नागरिक, संगमेश्वर तालुक्यातील प्रवासी तसेच कोकणवासीयांना मोठी सुविधा उपलब्ध होणार आहे. प्रवाशांच्या मागणीसाठी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला मिळालेले हे यश असून, यासाठी सहकार्य करणाऱ्या सर्वांचे संदेश जिमन यांनी आभार मानले आहेत.

