(संगमेश्वर)
तालुक्यातील फूणगुस येथील प्रसिद्ध हजरत शेख जाहीर शेख पिर दर्गा यांचा वार्षिक उर्स महोत्सव १ ते ४ फेब्रुवारी दरम्यान धुमधडाक्यात आणि जल्लोषात साजरा होणार आहे. या चार दिवसांच्या कार्यक्रमात विविध धार्मिक, सांस्कृतिक आणि परंपरागत कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
कोकणातील आणि महाराष्ट्र-गोवा राज्यातील भक्तांमध्ये प्रसिद्ध असलेल्या या दर्ग्याचे काचेचे कोरीव काम पर्यटकांसाठीही आकर्षणाचे केंद्र आहे. नवसाला पावणारा आणि जागरूक भक्तांसाठी प्रसिद्ध असलेला हा दर्गा, प्रत्येक वर्षी हजारो भाविक आणि पर्यटकांना आकर्षित करतो. गुरुवार व रविवारी तर येथे भाविकांची रांग लागलेली दिसते, तर कोकणासह संपूर्ण राज्य, गोवा आणि कर्नाटकमधूनही भक्त येथे येतात.
उर्स महोत्सव इस्लामी कॅलेंडरनुसार शाबान महिन्याच्या १२ तारखेपासून सुरू होतो, तर मुख्य कार्यक्रम १४ शाबान रोजी पार पडतो. या दिवशी मुस्लिम बांधवांसाठी पवित्र शब-ए-बरात साजरी केली जाते, ज्यामुळे उर्स महोत्सवाला विशेष महत्त्व प्राप्त होते.
यावर्षी उर्स महोत्सवाची सुरुवात १ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी ‘चुना मुबारक’ मिरवणुकीने होणार आहे.
२ फेब्रुवारी (सोमवार): दुपारी संदल मुबारक मिरवणूक, संपूर्ण मोहल्ला व बाजारपेठ मार्गे दर्गा परिसरात जाणार. रात्री नूराणी रातीब हा मुख्य कार्यक्रम पार पडणार आहे. तर ३ फेब्रुवारी (मंगळवार) उर्स पारंपरिक पद्धतीने साजरा केला जाईल. ४ फेब्रुवारी (बुधवार) नियाज (कंदोरी) कार्यक्रमाने चार दिवसांच्या उत्सवाची सांगता होणार आहे.
दर्गा व्यवस्थापक नूरमुहंमद मुजावर आणि मुस्वविर मुजावर यांनी भाविकांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

