(रत्नागिरी / प्रतिनिधी)
आंबा घाटातील दख्खन गावापासून सुमारे एक किलोमीटर अंतरावर आज (शनिवारी ४ जुलै) रोजी मोठी दरड कोसळल्याने महामार्गावरील वाहतुकीवर परिणाम झाला. दरडीमुळे एक मार्ग पूर्णपणे बंद करावा लागला असून, सध्या केवळ एका लेनवरून वाहतूक सुरू आहे. घटनेची माहिती मिळताच हातखंबा महामार्ग मदत केंद्राचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. दरड हटविण्यासाठी संबंधित ठेकेदार कंपनीला पाचारण करण्यात आले आहे.
मात्र, या घटनेने केवळ वाहतुकीचा प्रश्न निर्माण केला नसून महामार्गाच्या कामांच्या गुणवत्तेवर आणि नियोजनावरही गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. डोंगरकपारींची वैज्ञानिक तपासणी, उतारांचे स्थिरीकरण आणि संरक्षणात्मक उपाययोजना न करता मोठ्या प्रमाणावर करण्यात आलेल्या डोंगर कटाईचे परिणाम आता प्रत्यक्ष दिसू लागल्याची प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांकडून व्यक्त होत आहे. स्थानिकांच्या मते, महामार्ग रुंदीकरणाच्या नावाखाली अनेक ठिकाणी डोंगरांचे संतुलन बिघडेल अशा पद्धतीने खोदकाम करण्यात आले. पावसाळ्यापूर्वी आवश्यक संरक्षणभिंती, जाळ्या, उतार स्थिरीकरण किंवा पाणी निचऱ्याची प्रभावी व्यवस्था उभारण्यात आली नसल्याने दरडी कोसळण्याचा धोका वाढला आहे. त्याचा फटका आता थेट सर्वसामान्य वाहनचालकांना बसत आहे.
सध्या प्रशासन आणि पोलीस परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी प्रयत्नशील असले, तरी वारंवार दरडी कोसळणे ही नैसर्गिक आपत्ती नसून निष्काळजी नियोजन आणि अपुऱ्या सुरक्षितता उपाययोजनांचे परिणाम आहेत का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. कोट्यवधी रुपयांची कामे करणाऱ्या ठेकेदारांनी दर्जेदार आणि सुरक्षित काम करण्याऐवजी केवळ काम पूर्ण करण्यावर भर दिला का, याची चौकशी होणे आवश्यक असल्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
दरम्यान, या घटनेनंतर संबंधित यंत्रणांनी केवळ दरड हटविण्यावर समाधान न मानता संपूर्ण घाटमार्गाचे तांत्रिक सर्वेक्षण करावे, धोकादायक उतारांची तातडीने तपासणी करावी आणि निष्काळजीपणा आढळल्यास संबंधित ठेकेदार व जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे. अन्यथा, पुढील दरड कोसळल्यानंतर केवळ वाहतूक नव्हे तर मानवी जीवीताचाही मोठा प्रश्न निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

