(संगमेश्वर / एजाज पटेल)
आरोग्यसेवा ही नागरिकांना सुरक्षित आणि स्वच्छ वातावरणात मिळणे ही शासनाची मूलभूत जबाबदारी मानली जाते. मात्र, संगमेश्वर तालुक्यातील देवरुख ग्रामीण रुग्णालयात अस्वच्छतेचे गंभीर चित्र समोर आल्याने रुग्णांच्या आरोग्याविषयी चिंता व्यक्त केली जात आहे. शासनाकडून स्वच्छतेबाबत विविध मोहिमा राबविल्या जात असताना प्रत्यक्षात रुग्णालयातील परिस्थिती मात्र त्याला छेद देणारी असल्याचे दिसून येत आहे.
रक्ताचे डाग असलेल्या चादरींचा वापर
रुग्णालयातील काही बेडवर ‘महाराष्ट्र शासन आरोग्य सेवा’ असे छापलेल्या चादरींवर रक्ताचे सुकलेले डाग दिसून आल्याचा आरोप करण्यात आला आहे. रुग्णांना स्वच्छ आणि निर्जंतुक चादरी उपलब्ध करून देणे ही रुग्णालय प्रशासनाची जबाबदारी असताना अशा चादरींचा वापर होत असल्याने संसर्गजन्य आजारांचा धोका वाढू शकतो, अशी भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे तातडीने सर्व चादरी बदलून स्वच्छतेची योग्य व्यवस्था करण्याची मागणी होत आहे.
स्वच्छतागृहांची दुरवस्था
रुग्णालयातील स्वच्छतागृहांमध्ये घाण साचलेली असून तीव्र दुर्गंधी येत असल्याची तक्रार आहे. वॉश बेसिन परिसर, फरशी आणि अन्य भागांमध्ये दीर्घकाळ स्वच्छता न झाल्याचे चित्र दिसून येत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. रुग्णांसाठी ठेवलेल्या पाण्याच्या बादल्याही अस्वच्छ अवस्थेत असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.
डासांचा प्रादुर्भाव, संसर्गाचा धोका
स्वच्छतेअभावी रुग्णालय परिसरात डासांची वाढ झाल्याचीही तक्रार आहे. उपचारासाठी दाखल झालेल्या रुग्णांनाच अस्वच्छ वातावरणाचा सामना करावा लागत असल्याने त्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. रुग्णालयात नियमित स्वच्छता, निर्जंतुकीकरण आणि देखभाल होत आहे का, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
तातडीने कारवाईची मागणी
या पार्श्वभूमीवर वरिष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्यांनी देवरुख ग्रामीण रुग्णालयाची तातडीने पाहणी करून स्वच्छतेसंदर्भातील तक्रारींची चौकशी करावी, आवश्यक सुधारणा कराव्यात, रुग्णांसाठी स्वच्छ चादरी आणि स्वच्छतागृहांची तत्काळ व्यवस्था करावी तसेच संबंधित जबाबदार कर्मचाऱ्यांना आवश्यक सूचना द्याव्यात, अशी मागणी रुग्ण व नागरिकांकडून करण्यात येत आहे.

