(साखरपा / वार्ताहर)
साखरपा (ता. संगमेश्वर) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत असलेली 108 आपत्कालीन सेवेची ऍम्ब्युलन्स सध्या डॉक्टर अभावी बंद अवस्थेत असून, त्यामुळे साखरपा व आसपासच्या गावांतील रुग्णांची मोठ्या प्रमाणात हेळसांड होत आहे.
या गंभीर परिस्थितीकडे लक्ष वेधत, माजी पंचायत समिती सभापती जया माने यांनी 108 ऍम्ब्युलन्सचे डिस्ट्रिक्ट मॅनेजर (DM) यांच्याकडे तातडीने डॉक्टर उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे.
साखरपा आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रात अनेक गावांचा समावेश आहे. त्यामुळे येथे रोज मोठ्या प्रमाणात रुग्ण येत असतात. अपघात, हृदयविकार, सर्पदंश यांसारख्या तातडीच्या घटनांमध्ये 108 सेवा अत्यावश्यक असते. विशेषतः सध्या सुरू असलेल्या पावसाळी हंगामात शेतीची कामं सुरू असल्याने सर्पदंशाच्या घटनांत वाढ झाली आहे. तसेच, महामार्ग आणि घाट रस्त्यावर अपघातही घडत असतात. अशा वेळी ऍम्ब्युलन्सवर डॉक्टर उपलब्ध नसल्यामुळे रुग्णांना त्वरित उपचार मिळू शकत नाहीत.
या पार्श्वभूमीवर साखरपा परिसरातील नागरिकांना दिलासा मिळावा म्हणून, 108 ऍम्ब्युलन्सवर तातडीने डॉक्टर नियुक्त करावेत, अशी आग्रही मागणी जया माने यांनी केली आहे.