(देवरूख / वार्ताहर)
रत्नागिरी डिस्ट्रिक्ट अमॅच्युअर ॲथलेटिक्स असोसिएशनतर्फे एस. व्ही. जे. सी. टी.ज् स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, डेरवण येथे आयोजित जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धेत देवरूख शिक्षण प्रसारक मंडळाच्या आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालयातील चार विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली. त्यांच्या या कामगिरीच्या जोरावर २० वर्षांखालील गटातील राज्यस्तरीय मैदानी स्पर्धेसाठी त्यांची निवड झाली आहे. हे चारही विद्यार्थी राज्यस्तरीय स्पर्धेत एकूण सहा क्रीडा प्रकारांत महाविद्यालयाचे प्रतिनिधित्व करणार आहेत.
या स्पर्धेत सार्थक प्रकाश आडशे (इयत्ता बारावी, वाणिज्य-ब) याने गोळाफेकमध्ये प्रथम, तर उंच उडीमध्ये द्वितीय क्रमांक मिळवला. साईराज उमेश आंब्रे (प्रथम वर्ष, वाणिज्य) याने उंच उडीमध्ये प्रथम आणि गोळाफेकमध्ये द्वितीय क्रमांक पटकावला. चेतन सुरेश खामकर (द्वितीय वर्ष, कला) याने ८०० मीटर धावण्याच्या शर्यतीत प्रथम क्रमांक मिळवला. व्यंकटेश प्रशांत इंदुलकर (द्वितीय वर्ष, वाणिज्य) याने भालाफेकमध्ये प्रथम क्रमांक मिळवत राज्यस्तरीय स्पर्धेतील आपले स्थान निश्चित केले.
चारही विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल देवरूख शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थाध्यक्ष सदानंद भागवत, नेहा जोशी, कृष्णकुमार भोसले, शिरीष फाटक, सुजाता प्रभुदेसाई, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर, उपप्राचार्य डॉ. सरदार पाटील, पर्यवेक्षक प्रा. एम. आर. लुंगसे तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले असून, आगामी राज्यस्तरीय स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.

