( संगमेश्वर / प्रतिनिधी )
पुणे येथील चपराक प्रकाशनचे भावंड असलेल्या लाडोबा प्रकाशनने संगमेश्वर येथील लेखक जे. डी. पराडकर यांच्या ‘ आजी आजोबांच्या गोष्टी ’ या पुस्तकाचे प्रकाशन कवी केशवसूत यांच्या ७ नोव्हेंबर रोजीच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून साहित्य प्रेमींच्या प्रेमींच्या उपस्थितीत करण्यात आले. चपराकने प्रकाशित केलेले पराडकर यांचे हे सलग ११ वे पुस्तक आहे.
सध्याच्या काळात नातवंड आजी आजोबांच्या कुशीत शिरून गोष्टी ऐकण्याचं प्रमाण काहीसे कमी झालं आहे. हाच धागा पकडून या पुस्तकात आजी आजोबांच्या एका पेक्षा एक भन्नाट कथा पराडकर यांनी लिहिल्या आहेत. याबरोबरच आजोळ, माहेर याविषयीचे महत्व देखील या पुस्तकात वाचायला मिळणार आहे. हे पुस्तक चपराकचेच भावंड असलेल्या लाडोबा प्रकाशनने खास बालकुमारांसाठी प्रकाशित केले आहे.
या पुस्तकाची प्रस्तावना प्रसिद्ध अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांनी लिहिली असून पाठराखण प्रसिद्ध गायिका रंजना जोगळेकर यांनी केली आहे. लहानाचं मोठं केलेल्या आपल्याच मुलांकडून वयोवृद्ध झाल्यावर आई-वडिलांना वृद्धाश्रमात राहावं लागतं. यातील काही आपल्या मनाने जातात तर काही नाईलाजाने आणि मनाविरुद्ध वृद्धाश्रमाचा रस्ता धरतात. सुखाच्या मागे धावत असताना आपण काय गमावतो आहोत ? याचं भान नसल्याने अशा गोष्टी सर्रास घड्डू लागल्या आहेत. आजी-आजोबांशिवाय घर म्हणजे योग्य संस्कारांचा अभाव असतं. एकत्र कुटुंब पद्धती संपुष्टात येत असताना विभक्त होणारी छोटी कुटुंबव्यवस्था जोर धरू लागली. यामुळे नात्यांचे बंध तुटू लागलेत. कदाचित यामुळेच आता वृद्धाश्रमात मोठी गर्दी होताना दिसतेय. स्वतःचं घर असतानाही मनाविरुद्ध आणि नाईलाजाने वृद्धाश्रमात राहावं लागणाऱ्या असंख्य आजी – आजोबांना ‘आजी आजोबांच्या गोष्टी’ हे पुस्तक लेखक जे. डी. पराडकर यांनी समर्पित केलं आहे.
पुस्तक प्रकाशन सोहळा चपराकचे संपादक घनश्याम पाटील , लाडोबाच्या संपादिका ज्योती घनश्याम पाटील , संगमेश्वर येथील उद्योजक अनिल भिडे, अभय गद्रे, देवरुखचे प्राध्यापक धनंजय दळवी, लेखक जे. डी. पराडकर, सौ. वेदिका पराडकर आणि असंख्य साहित्य प्रेमी यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
▪️ पुस्तकाचे नाव – आजी आजोबांच्या गोष्टी
▪️ प्रकाशक – लाडोबा प्रकाशन पुणे
▪️ पृष्ठ संख्या – १००
▪️ मुखपृष्ठ – हेमंत सावंत
▪️ पुस्तक मागविण्यासाठी संपर्क – चपराक प्रकाशन ७०५७२९२०९२

