(रत्नागिरी / प्रतिनिधी)
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेअंतर्गत जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जाच्या ओझ्यातून दिलासा देण्याचे प्रयत्न प्रशासनाकडून सुरू असले, तरी प्रत्यक्ष लाभ मिळण्याच्या प्रक्रियेत विविध तांत्रिक आणि प्रशासकीय अडचणींचा अडसर निर्माण झाला आहे. योजनेच्या पहिल्या यादीत जिल्ह्यातील ७ हजार ७८ शेतकरी पात्र ठरले होते. त्यापैकी विविध कारणांमुळे ५३ शेतकरी अपात्र ठरल्याने आता ७ हजार २५ शेतकरी पात्र राहिले आहेत. मात्र, यापैकी तब्बल ३ हजार १४१ शेतकऱ्यांची ई-केवायसी अद्याप प्रलंबित असल्याने अनेक शेतकरी कर्जमुक्तीच्या लाभापासून वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
जिल्ह्यातील नऊ तालुक्यांमधून सुरुवातीला ७ हजार ७८ शेतकरी या योजनेसाठी पात्र ठरले होते. मात्र, पात्रता तपासणीदरम्यान विविध कारणांमुळे ५३ जण अपात्र ठरले. त्यामुळे आता ७ हजार २५ शेतकरी लाभासाठी पात्र आहेत. योजनेचा लाभ मिळविण्यासाठी पात्र शेतकऱ्यांना अॅग्रीस्टॅक नोंदणी आणि आधार प्रमाणीकरणासह ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक आहे. ही प्रक्रिया पूर्ण न झाल्यास पात्र असूनही कर्जमुक्तीचा लाभ मिळणार नसल्याने शेतकऱ्यांची धावपळ सुरू आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील ३ हजार ८८८ शेतकऱ्यांची ई-केवायसी पूर्ण झाली आहे. त्यापैकी २ हजार ८३२ शेतकऱ्यांना प्रत्यक्ष कर्जमुक्तीचा लाभ मिळाला असून, त्यांच्या खात्यांमध्ये १२ कोटी ९३ लाख ६८ हजार ६७८ रुपये कर्जमुक्तीची रक्कम वर्ग करण्यात आली आहे.
यामध्ये जिल्हा बँकेच्या २ हजार १८९ खातेदारांना ६ कोटी ८१ लाख ८४ हजार ५०२ रुपये, तर राष्ट्रीयीकृत आणि अन्य बँकांच्या ६४३ खातेदारांना ६ कोटी ११ लाख ७४ हजार १७६ रुपयांची कर्जमुक्ती मिळाली आहे. उर्वरित पात्र शेतकऱ्यांची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्यांच्या कर्जखात्यातही शासनाकडून कर्जमुक्तीची रक्कम वर्ग होणार आहे. त्यानंतर संबंधित शेतकरी पुन्हा कर्ज घेण्यास पात्र ठरणार आहेत.
कर्जमुक्तीच्या प्रक्रियेत पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांपुढे मात्र विविध कारणांमुळे अडचणींचा डोंगर उभा राहिला आहे. काही लाभार्थी मृत झाले आहेत, काही परगावी स्थलांतरित झाले आहेत, तर काहींचे बायोमेट्रिक प्रमाणीकरण होत नसल्याने ई-केवायसी रखडली आहे. देवस्थान जमिनी, संमतीपत्रावर घेतलेले कर्ज, ॲग्रीस्टॅक नोंदणीतील त्रुटी आणि पोर्टलवरील तांत्रिक अडचणी यामुळेही अनेक शेतकरी प्रक्रियेत अडकले आहेत.
प्रलंबित ई-केवायसीमागील कारणांची स्थिती :
– ॲग्रीस्टॅक न झालेले – १,२८३
– ॲग्रीस्टॅक प्रमाणीकरण न झालेले – ९८६
– संमतीपत्रावर कर्जवाटप – ८६०
– तांत्रिक त्रुटी – ३१३
– मृत लाभार्थी – १८१
– परगावी स्थलांतरित – ११४
– बायोमेट्रिक प्रमाणीकरण न होणारे – ५९
– देवस्थान जमिनी – २४
पात्र असूनही लाभापासून वंचित राहण्याची भीती
एकीकडे शासनाच्या योजनेत पात्रता मिळाल्याने शेतकऱ्यांच्या अपेक्षा वाढल्या आहेत; मात्र दुसरीकडे अॅग्रीस्टॅक, आधार प्रमाणीकरण आणि तांत्रिक प्रक्रियेतील अडथळ्यांमुळे प्रत्यक्ष लाभ मिळण्यास विलंब होत आहे. त्यामुळे ‘पात्रता असूनही लाभ नाही’ अशी परिस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी प्रशासनाने प्रलंबित ई-केवायसी आणि तांत्रिक अडचणी तातडीने दूर करण्याची गरज व्यक्त होत आहे.

