( राजापूर / वार्ताहर )
सामाजिक बांधिलकी जपत विविध उपक्रम राबविणाऱ्या रत्नागिरी जिल्ह्यातील ‘जैतापूरचा राजा’ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने यंदा आपल्या सक्रिय सदस्यांसह मोलमजुरी करून उदरनिर्वाह करणाऱ्या काही गरीब कुटुंबांना विमा संरक्षण देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
मंडळाच्या या उपक्रमाच्या पार्श्वभूमीवर जैतापूर पोस्ट ऑफिसचे कर्मचारी ओंकार माजरेकर यांच्याकडून मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी विविध विमा योजनांची माहिती घेतली. सदस्यांना भविष्यातील आर्थिक संकटाच्या काळात आधार मिळावा, तसेच गरजू कुटुंबांना सुरक्षा कवच मिळावे, या उद्देशाने लवकरच विमा काढण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे.
मंडळातील प्रत्येक सक्रिय सदस्याला किमान पाच लाख रुपयांचे विमा संरक्षण मिळेल, अशा स्वरूपाचा सामूहिक विमा काढण्याचा मंडळाचा मानस आहे. विशेष म्हणजे या विम्याचा वार्षिक प्रीमियम मंडळातर्फे भरण्यात येणार आहे. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसह मंडळाच्या सक्रिय सदस्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव न ठेवता सामाजिक उपक्रमांनाही प्राधान्य देण्याची भूमिका ‘जैतापूरचा राजा’ मंडळाने घेतली आहे. त्याचाच एक भाग म्हणून सदस्य आणि गरजू कुटुंबांना विमा संरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मंडळाच्या या सामाजिक उपक्रमाचे परिसरातून कौतुक होत आहे.
दरम्यान, मंडळाच्या सर्व सदस्यांनी सक्रिय सदस्य म्हणून आपली नोंदणी लवकरात लवकर मंडळाचे खजिनदार सुनील करगुटकर यांच्याकडे करावी, असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष गिरीश करगुटकर यांनी केले आहे.

