(रत्नागिरी)
रत्नागिरी तालुक्यातील जांभूळफाटा येथे आज (गुरुवारी एका तरुणाने पाकिस्तानच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केल्याने खळबळ उडाली. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या स्थानिक ग्रामस्थांनी संबंधित तरुणाला बेदम मारहाण केली. गंभीर जखमी अवस्थेत त्याला तात्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, सध्या रुग्णालयात प्रचंड पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
दरम्यान, पहलगाममध्ये निष्पाप भारतीय नागरिकांवर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर कारवाई सुरू केली आहे. संपूर्ण देश या कारवाईला पाठिंबा देत असताना, अशा संवेदनशील काळात पाकिस्तानच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केल्याचा प्रकार उघडकीस आल्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेची चौकशी सुरू असून, संबंधित तरुणाविरोधात कायदेशीर कारवाईचे संकेत पोलिसांनी दिले आहेत.