(रत्नागिरी / वैभव पवार)
नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतील जंतरमंतर येथे सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शविण्यासाठी गुरुवार, २३ जुलै रोजी रत्नागिरीत मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. शिव, शाहू, फुले, आंबेडकर विचारमंचच्या वतीने आयोजित या मोर्चात मंडणगड ते राजापूरपर्यंतच्या नागरिकांसह विद्यार्थी, सामाजिक कार्यकर्ते आणि विविध क्षेत्रातील प्रतिनिधी सहभागी होणार असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते नौसीन काझी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
काझी यांनी सांगितले की, जंतरमंतरवरील आंदोलनादरम्यान आंदोलकांवर करण्यात आलेली पोलिसांची कारवाई, महिलांवरील कथित अत्याचार आणि आंदोलनकर्त्यांशी झालेल्या वागणुकीबाबत रत्नागिरी जिल्ह्यातील नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. या पार्श्वभूमीवर आंदोलनाला पाठिंबा दर्शविण्यासाठी हा मोर्चा आयोजित करण्यात आला आहे.
गुरुवारी सकाळी ११ वाजता मारुती मंदिर येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करून मोर्चाला सुरुवात होईल. त्यानंतर मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार असून, जिल्हाभरातील नागरिक, विद्यार्थी, सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी आणि विविध राजकीय पक्षांचे कार्यकर्ते सहभागी होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
नीट परीक्षा पेपरफुटीमुळे अनेक विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर परिणाम झाल्याचा आरोप करत आंदोलनकर्त्यांनी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. या मागणीकडे दुर्लक्ष करून आंदोलनकर्त्यांवर पोलिसांकडून बळाचा वापर करण्यात आल्याचा निषेध उद्याच्या मोर्चातून व्यक्त करण्यात येणार असल्याचेही नौसीन काझी यांनी स्पष्ट केले.

